संगमनेर शहरात चोरट्यांचे धाडस वाढले, पोलिसांचा धाक संपला

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून चेन स्नॅचिंग, सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी, घरफोड्या, दुकाने फोडणे, जनावरांची चोरी, दुचाकी चोरी अशा घटना दिवसाढवळ्या आणि एकाच रात्रीत घडत आहेत. केवळ एका दिवसात तब्बल 6 ते 7 ठिकाणी तर दोन दिवसात तब्बल 13 ते 15 ठिकाणी चोर्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शहर पोलिसांचा वचक संपल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
शहरात चोरीच्या घटनांचे प्रमाण सातत्याने वाढत असून विशेषतः मंगळसूत्र, गंठण चोरी ही महिलांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटना भर दिवसा घडत आहे. तर रात्री शहराच्या विविध भागात चोरी सत्र सुरू असून पोलिसांची रात्रीची गस्त खरोखर सुरू आहे का? याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.
भरदिवसा चेन स्नॅचिंग – सुकेवाडी रोडवर दुचाकीवरून जात असलेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पाठलाग करत दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. या प्रकरणी अश्विनी अरुण ताजणे (रा. ताजणे मळा, नवीन नगर रोड, संगमनेर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहरातील मालदाड रोड, घुलेवाडी, एकता चौक, तिरंगा चौक, गोल्डन सिटी परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत अक्षरशः धुमाकूळ घातला. महालक्ष्मी कॉलनी (मालदाड रोड) येथील एका घराचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कमचे चोरी झाली. दत्तू भिकाजी आव्हाड यांच्या घरातून 1500 रुपये रोख चोरी, सोमनाथ विठ्ठल येडे यांचे घरफोडीचा प्रयत्न, दत्तात्रय अरुण जोशी यांचे कपाट फोडून चोरी, शांताबाई किसन सातपुते यांच्या गोठ्यातील दोन शेळ्या चोरी, कैलास भाऊराव शेटे यांच्या घराचे लॉक तोडले. प्रकाश बबन गुंड यांचा दवाखाना व मेडिकल फोडले. त्याचबरोबर गोल्डन सिटी, अरगडे मळा येथे सेफ्टी गेटचे लॉक तोडून घरातून 82,000 किमतीचा ऐवज चोरून नेण्यात आला. या प्रकरणी प्रियंका संतोष ढोणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 24 तासात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने यातील फिर्यादींनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास जणू रांगच लावली होती. नागरीकांचा रोष पहाता शहरात चोरट्यांची किती दहशत आहे. याची कल्पना येते.

पोलिसांची गस्त कुठे आहे?- एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत असताना पोलिसांची प्रतिबंधात्मक यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. चोरट्यांना कायद्याची भीती उरलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
संगमनेरात चोरट्यांचा धुमाकूळ आणि पोलिसांचा निष्क्रियपणा स्पष्ट दिसतो आहे. सातत्याने होणार्या चोर्यांसाठी निष्क्रिय पोलिस यंत्रणाच जबाबदार असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


















