अठराव्या ‘एक्सपो’ चे दिमाखात उद्घाटन !

संगमनेर (प्रतिनिधी )
“विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा सहभाग उत्कृष्ट नियोजन आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे लायन्स सफायर च्या वतीने आयोजित करण्यात येणारा सफायर बिझनेस एक्सपो संपूर्ण राज्यात प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. प्रत्येक वर्षी त्याची व्याप्ती वाढत चालली आहे. सलग अठरा वर्षे मिळविलेले हे यश खरोखर अभ्यासाचा विषय आहे” असे प्रतिपादन नगरसेविका सौ. रचना मालपाणी यांनी येथे केले.
15 जानेवारी ते 21 जानेवारी असे सात दिवस मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या सफायर बिझनेस एक्सपोचे उद्घाटन सौ मालपाणी यांच्या हस्ते संपन्न झाले . तेव्हा झालेल्या उद्घाटन सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना त्यांनी वरील भावना बोलून दाखविल्या. यावेळी व्यासपीठावर, सौ नीलम खताळ, सफायरचे संस्थापक उद्योगपती गिरीश मालपाणी, प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल खिवंसरा, श्रीनिवास भंडारी, अध्यक्ष कल्याण कासट, सेक्रेटरी सुमित मणियार, खजिनदार नामदेव मुळे, स्टॉल धारकांचे प्रतिनिधी डॉक्टर सुरेंद्र महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

नगरसेविका सौ मालपाणी आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की ” नाविन्याची परंपरा जपल्यामुळे सफायर बिझनेस एक्सपो 18 वर्षे होऊन देखील नवीन, ताजा आणि टवटवीत वाटतो. खरेदी, मनोरंजन आणि मेजवानी यांचा सुरेख त्रिवेणी संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. संगमनेर तालुका सर्वार्थाने समृद्ध आहे. येथील समृद्ध कृषी संस्कृतीला सचोटीच्या संस्कारातील व्यापारी क्षेत्राची साथ आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. बिझनेस एक्सपोमुळे एकाच ठिकाणी विविध प्रकारची उत्पादने बघणे, खरेदी करणे इत्यादी गोष्टी शक्य होतात. त्यामुळे महिला वर्गासाठी तर हे वरदान ठरले आहे. यंदाचा एक्सपो देखील गर्दीचे उच्चांक प्रस्थापित करील”
सौ खताळ यांनी आपल्या भाषणामध्ये सफायर बिझनेस एक्सपो ची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आमदार अमोलजी खताळ महत्त्वाच्या कामानिमित्त मुंबई येथे असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही त्यांच्या वतीने या भव्य एक्सपोला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आले आहे असे त्या म्हणाल्या.. हा एक्सपो म्हणजे संगमनेरचे वैशिष्ट्य ठरला आहे असे त्या म्हणाल्या. सर्व वयोगटातील नागरिकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार वस्तू, खाद्यपदार्थ , मनपसंत उपकरणे मिळण्याचे हे हक्काचे ठिकाण झाले आहे असे मत त्यांनी मांडले.

गिरीश मालपाणी यांनी स्वागतपर भाषणामध्ये एक्सपो पाठीमागील भूमिका विषद केली.
“अठरा वर्षांच्या सलग अनुभवातून आम्ही सातत्यपूर्ण सुधारणा करीत असल्याने स्टॉलच्या बुकिंग साठी राज्यभरातून प्रचंड मोठी वेटिंग लिस्ट असते. प्रत्येक वर्षी 25% नवीन स्टॉल धारक दाखल होतात. आम्ही नियोजनबद्ध रीतीने जाहिरात मोहीम राबवतो. आमची प्रकल्प समिती अडीच तीन महिने या प्रकल्पावर प्रचंड मेहनत घेते आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने अठरा वर्षे हा एक्सपो निर्विघ्नपणे पार पडतो. एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा बिझनेस एक्सपो म्हणजे प्रात्यक्षिकातून शिक्षण देणारा एक पथदर्शक प्रकल्प ठरला आहे ” असे ते म्हणाले. सफायरने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी डॉक्टर सुरेंद्र महाडिक,डॉ अमोल पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण कासट व श्रीनिवास भंडारी यांनी तर आभार प्रदर्शन कल्पेश मर्दा यांनी आणि सूत्रसंचालन अतुल अभंग यांनी केले.

















