नाशिक-पुणे हायवेच्या खड्डे आणि ट्रॅफिकमुळे मनस्ताप- आ. सत्यजित तांबे

0
23

संगमनेर (प्रतिनिधी) –
नाशिक-पुणे हायवेची ट्रॅफिक, रस्त्यांवरील खड्डे यावर सत्यजीत तांबे यांनी पुन्हा आवाज उठवला आहे. दैनिक युवावार्ताने 25-09-2025 च्या अंकामध्ये जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नये अशी बातमी टाकली होती. तशीच मागणी आता आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रस्ते बांधणी विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

पुणे-नाशिक ही सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भात देखील आ. तांबे यांनी लक्ष वेधून घेतले. मी वेळोवेळी ही रेल्वे नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-चाकण-पुणे अशी सरळमार्गे करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या सरळमार्गी रेल्वेचे तसे सर्वेक्षणही झाले होते. मात्र केवळ कोणाच्यातरी स्वार्थासाठी आता ती वळवून शिर्डी मार्गे करण्याचा घाट घातला जातोय. जर ही रेल्वे सरळमार्गे झाली, तर संगमनेर, सिन्नर, नारायणगाव, जुन्नर, मंचर येथील तरुणांना संगमनेरमध्येच वास्तव्य करून रोज पुण्यात नोकरीसाठी, शिक्षणासाठी, उद्योग-व्यवसायासाठी जाता येईल. संगमनेर हे नाशिक व पुणे यांना पर्यायी असे विकासाचे केंद्र बनेल. संगमनेर शहराला व तालुक्याला विकासाची नवसंजीवनी देणारा हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे ही माझी आजही आग्रही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
संगमनेर हे पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणार्‍या वाहतुकीचं एक महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे. पुणे-नाशिक द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि वाहतुकीच्या समीकरणात मोठा बदल होत आहे. पण या प्रकल्पात खर्‍या अर्थाने महत्त्वाच्या शहरांचा विचार केला जातोय का? असा प्रश्‍नही आ. तांबे यांनी उपस्थित केला आहे. आज लोणी किंवा संगमनेरला जायचं झालं, तर समनापूरजवळून मोठा फेरा घ्यावा लागतो. समनापूर जवळून जात असलेल्या पुणे नाशिक द्रुतगती मार्गावर संगमनेरला थेट इंटरचेंज द्यावा म्हणून 10 जुलै 2025 रोजी विधीमंडळात मी हा मुद्दा स्पष्टपणे मांडल्याचेही त्यांनी सांगितले. विकास हा सर्वसमावेशक असावा, केवळ निवडक भागापुरता मर्यादित नसावा ही माझी स्पष्ट भूमिका आहे. सरकारने या मागणीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करावी असेही आ. तांबे म्हणाले.

आ. सत्यजित तांबे यांची मागणी
सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी
पब्लिक ट्रान्सपोर्टची ताकद यातून दिसेल
संगमनेरचे तरूण पुण्यातील नोकरीसाठी
दररोज जा- ये करू शकतील
सिन्नर, नारायणगाव, जुन्नर, मंचरच्या
नागरिकांनी याचा विचार करावा
नाशिक-पुणे महामार्गावर प्रचंड खड्डे आहेत
रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल बंद करावेत
ना. गडकरींना रस्त्याबाबतची कल्पना दिली
टोल भरून विकतचे दुखणे
समनापूर जवळून जात असलेल्या
पुणे-नाशिक द्रुतगती मार्गावरून संगमनेरला
इंटरचेंज मिळालाच पाहिजे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here