आर्थिक तडजोड करून आरोपी सोडल्याचा आरोप

संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखा (डी.बी.) मधील दोन कर्मचाऱ्यांनी मोटारसायकल चोरीच्या संशयित आरोपीला आर्थिक तडजोड करून सोडून दिल्याचा गंभीर आरोप जनसेवक राहुल नंदकुमार भोईर यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, संगमनेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील डी.बी. मधील दोन कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली होती. प्लॅटीना मोटारसायकल (एम.एच. १२ पी.व्ही. २०७०) चोरीप्रकरणातील संशयित आरोपीला सोडवण्यासाठी नुकताच निवडून आलेला एक नगरसेवक आर्थिक तडजोडीसाठी पोलिस ठाण्यात आल्याची खात्रीशीर माहिती असल्याचा दावा करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून सदर आरोपीला सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

संगमनेर शहरात दररोज दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक दुचाकी चोरीचे प्रकार संगमनेर तालुक्यात घडत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे काय, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डी.बी. मधील दोन्ही कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, तसेच संगमनेर शहरातील डी.बी. विभाग तात्काळ बरखास्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी जनसेवक राहुल भोईर यांनी केली आहे.
या निवेदनामुळे संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






















