संगमनेर पोलिसांची धडक कारवाई – 12 लाखांचे गोवंश जनावरांची सुटका

संगमनेर (प्रतिनिधी)-
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी सलग दुसर्या दिवशी विविध भागात ऑपरेशन ऑल आऊट अभियान राबवून विविध भागातील कत्तलखान्यांवर छापे टाकले. या कारवाईत 17 गायी, बैल आणि एक वासरू अशा आठरा गोवंशीय जनावरांची सुटका केली. याप्रकरणी 5 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने कत्तलखाने, गोहत्येच्या गुन्ह्यातील आरोपी, वाहतूक करणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील 32 पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व पथकांनी शहरासह ग्रामीण भागातील विविध कत्तलखान्यांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान गुरुवारी 5 जून रोजी 113 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली आहे होती. तर विविध ठिकाणी नाकाबंदी करत 23 कारवाया करण्यात आल्या आहेत. ही कारवाई काल शुक्रवारी दि. 6 जून रोजी देखील सुरुच ठेवण्यात आली. संगमनेर शहर परिसरात पाच ठिकाणी शुक्रवारी रात्री छापे मारून मोठी कारवाई करण्यात आली.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील काही ठिकाणी कत्तलीच्या उद्देशाने अन्न पाण्यावाचून गोवंश जनावरे बांधून ठेवण्यात आली आहे. अशी गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलिस पथकाने शुक्रवारी सायंकाळी पुन्हा ऑपरेशन ऑल आऊट सुरू केले. त्यानुसार सायंकाळी पाच वाजता रमाई गार्डन जवळील काटवनात छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन लाख दहा हजार रुपये किंमतीची तीन जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी पो.काँ. हरिश्चंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर (521-2925) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बौद्ध समाजाच्या स्मशानभूमी जवळील काटवणात करण्यात आली. या ठिकाणी पुन्हा दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे तीन गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेले आढळून आले. याप्रकरणी पोलीस कॉ. संतोष बाचकर यांच्या फिर्यादीवरून (522- 2025) अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा रात्री साडेसात वाजता शहरा जवळील मदिना नगर परिसरातील म्हसोबा मंदिर समोरील काटवनात शोध घेतला असता या ठिकाणी पुन्हा दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे तीन गोवंश जनावरे अन्न पाण्याविना कत्तलीसाठी बांधून ठेवलेले आढळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे 523-2025) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा याच परिसरातील उर्दू शाळेच्या मागील बाजूला असणार्या काटवणात नेला. या ठिकाणी पोलिसांना दोन लाख 80 हजार रुपये किमतीचे चार गोवंश जनावरे निर्दयपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. याप्रकरणी पो. कॉ. राहुल सारबंदे यांच्या फिर्यादीवरून 524-2025) अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अलका नगर परिसरातील काटवनात देखील पोलिसांनी मोठी कारवाई केली. या ठिकाणी दोन लाख 80 हजार रुपये किमतीचे पाच गोवंश जनावरे व दहा हजार रुपये किमतीचे एक वासरू यांची कत्तली पासून सुटका केली. याप्रकरणी पो. ना. राहुल डोके यांच्या फिर्यादीवरून 525-2025) अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारे शहर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार बकरी ईदच्या पूर्व संधेला केलेल्या ऑपरेशन ऑल आऊट कारवाईत तब्बल 11 लाख 90 हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरे तसेच दहा हजार रुपये किमतीचे एक वासरू असे सुमारे 12 लाख रुपये किमतीच्या जनावरांची सुटका केली.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोवंशीय जनावरांची वाहतूक करणार्यांवर पोलिसांची नजर राहणार असून, गोहत्या करणार्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकाचवेळी ही मोहीम राबविण्यात येत असून, गुन्हेगारांवर कारवाया करण्यात आल्या आहेत.





















