संगमनेरात नायलॉन मांजाचा कहर सुरूच

0
154

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरात नायलॉन मांजाचा कहर सुरू असून सलग दोन दिवसांत घडलेल्या गंभीर घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंदी असतानाही सर्रास वापर व विक्रीमुळे नायलॉन मांजाने तिघांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न जनता विचारत आहे.
जॉर्वे नाका परिसरात सायकलवरून जाणार्‍या एका नागरिकाच्या पायाला नायलॉन मांजा अडकून त्याचा पाय चक्क कापला गेला. ही घटना ताजी असतानाच दुपारी शहरातील एका रस्त्यावरून जाणार्‍या महिलेच्या हाताला नायलॉन मांजा लागून गंभीर जखम झाली. या दोन्ही घटनांमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, संध्याकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास नाईकवाडपुरा परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली. हुजेब रौफ शेख (वय 23, रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) हे आपल्या बहिणीला ट्युशनसाठी मोटारसायकलवरून घेऊन जात असताना अचानक नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. त्यांनी क्षणार्धात मान फिरवल्यामुळे मांजाने त्यांच्या कानासह गळ्याला खोलवर चिरा दिल्या. या घटनेत हुजेब शेख गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नायलॉन मांजामुळे मान, कान, हात व पायाला होणार्‍या जखमा अत्यंत प्राणघातक ठरत असून यापूर्वीही राज्यात अनेक अपघातांत निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीदेखील संगमनेर शहरात बंदी असलेला नायलॉन मांजा खुलेआम विकला जात असल्याचे वास्तव या घटनांतून समोर येत आहे.
विशेष म्हणजे, प्रशासनाकडून वेळोवेळी नायलॉन मांजावर बंदी व कारवाईच्या सूचना दिल्या जातात. मात्र स्थानिक पतंग व मांजा विक्री करणारे काही दुकानदार कायद्याला केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या बेकायदेशीर विक्रीमुळेच अशा घटना घडत असून याला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी नायलॉन मांजा विक्री करणार्‍या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. केवळ जप्तीपुरती मर्यादित न राहता गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याची कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही.
नायलॉन मांजाचा वापर व विक्री थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन, नगरपरिषद आणि महसूल विभागाने संयुक्तपणे विशेष मोहिम राबवावी, तसेच दोषींवर कडक कारवाई करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी जोरदार मागणी आता संगमनेर शहरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here