कशी झाली सत्तास्थापना ? कोण होते नगराध्यक्ष ? कसे झाले होते आघाडीचे प्रयोग

संगमनेर (प्रतिनिधी) – शेख नूर मोहम्मद शरफुद्दीन पहिलवान हे संगमनेर नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट चालू झाली. सदर प्रशासकीय राजवट राज्यातील बहुतांश नगरपरिषदांमध्ये होती. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शासकीय अधिकारी यांचे राज्य होते. संगमनेर नगर परिषदेमधील प्रशासकीय राजवट संपून निवडणुका झाल्या त्यावेळी निवडणुका वैयक्तिक पातळीवर लढवल्या जायच्या. जो तो आपल्या भागातील प्रभाव अथवा सामाजिक कार्यातून निर्माण झालेल्या लोकप्रियतेतून निवडून यायचा. प्रशासकीय राजवट संपवून झालेल्या निवडणुकीत रामकिसन खंडेलवाल महाराज हे अनुभवी माजी नगराध्यक्ष. राधावल्लभ कासट, एस. झेड. देशमुख सर, शेख जान मोहम्मद, दशरथ पडवळ, भाऊ पानसरे, समशेर अली जहागीरदार, केशव मुर्तडक, लोहे बंधू, डॉ कासट, विलास मेंद्रे इत्यादी मान्यवर नगरसेवक म्हणून निवडून आले. निवडून आलेल्या इतर नगरसेवकांची मोट बांधून खंडेलवाल महाराज यांनी आपला गट करून नगराध्यक्षपद हातात घेतले. 1985 साली संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून बाळासाहेब थोरात निवडून आले. नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर त्यांनीही आपला गट तयार करून नगरपरिषदेत सत्ता संघर्ष सुरू केला. त्याचे नेतृत्व राधावल्लभ कासट या हिंदुत्ववादी नगरसेवकाकडे दिले. खंडेलवाल महाराज हे केवळ एका मताने नगराध्यक्ष झाल्याने दोन्ही गट तुल्यबळ राहिले. आमदार थोरात यांच्या पाठिंब्यावर कासट गट जास्त क्रियाशील होता. मात्र खंडेलवाल महाराज हे धुरंदर व अनुभवी राजकारणी असल्याने खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाठबळाने त्यांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही.

या काळात संगमनेरचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनला होता. भंडारदरा धरणाच्या प्रवरा नदीच्या रोटेशनवर शहरातील पाणीपुरवठा अवलंबून असायचा. नागरिकांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागायचे. सर्वांच्या घरासमोर रस्त्यावर तीन ते चार फूट खड्डयांमध्ये नळ घेऊन पाणी भरावे लागायचे. तेही अतिशय कमी दाबाने असायचे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवयाचा. ही परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे पाहून आ. बाळासाहेब थोरात यांनी प्रवरा नदीवर वसंत बंधारा बांधणे हा एकमेव उपाय असल्याचा प्रचार करीत जन आंदोलन उभे केले. धरणे मोर्चे आदी प्रकारचे आंदोलने करून मोठी जनजागृती केली. या माध्यमातून असंतुष्ट नगरसेवक आपल्या गटात घेऊन नगरपरिषदेमध्ये बहुमत मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. या काळात नगरपरिषदेतील वातावरण नेहमी अशांत राहिले. अशातच कुरघोडीचे पेव फुटले. थोरात यांच्या गटात अनेक नगरसेवक फुटून सामील झाल्याने त्यांनी खंडेलवाल महाराज यांच्यावर अविश्वास ठराव आणला. त्यामुळे महाराजांनी राजीनामा दिला व त्यानंतर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष आमदार थोरात यांच्या पाठिंब्याने राधावल्लभ कासट हे नगराध्यक्ष झाले. कासट यांनी प्रशासनावर अंकुश मिळवून कारभार चालू ठेवला मात्र या दरम्यान आ. थोरात यांच्याबरोबर मतभेद झाल्याने कासट यांना पायउतार व्हावे लागले. शहरातील वातावरणात, धार्मिक द्वेष वाढीस लागले, छोट्या मोठ्या दंगलीचे प्रयत्न झाले. राधावल्लभ कासट पायउतार झाल्यानंतर अनेक राजकीय उलथापालथी झाल्या.

बाळासाहेब थोरात राज्याच्या राजकारणात सक्रीय असल्याने संगमनेरच्या स्थानिक निवडणुका डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, दिलीपराव पुंड यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढवले जात होते. अनेक वर्ष संगमनेरकरांनी या नेतृत्वाला साथ दिली. या नेतृत्वापाठीमागे शहरातील विश्वास मुर्तडक, निलेश जाजू, मुकेश मिलाणी, योगेश जाजू, धनंजय डाके, हिरालाल पगडाल सर, इसाहकखान पठाण, डॉ. दानिश पठाण, किशोर पवार, बाळासाहेब पवार, सोमेश्वर दिवटे, गणेश मादास, किशोर टोकसे, विवेक कासार, गजेंद्र अभंग, नितीन अभंग, शैलेश कलंत्री, नुरमोहम्मद शेख,सुमनताई भडांगे, पारूबाई सुर्यवंशी, शोभा पुंड, सुनंदाताई दिघे, प्रमिला अभंग, सुहासिनी गुंजाळ, पूनम मुंदडा यांच्यासह अनेक नगरसेवकांनी आक्रमक साथ दिली. आघाडीचा इतिहास राहिलेल्या संगमनेरात पुन्हा एकदा आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहर आघाडीचा प्रयोग होत असून यात अनेक समविचारी नेते, पक्ष सहभागी होत आहे. त्यामुळे शहरविकास आघाडी प्रभावी असण्याची शक्यता आहे.

या काळात नगरपरिषदेसाठी पक्षांतर बंदी कायदा लागू नसल्याने गटबाजी करणे अतिशय सोपे होते. कोणीही कधीही कोणाच्या गटात सामील होत होते. तसेच गट सोडून जात होते, नवीन तयार होणार्या गटाची अथवा आघाडीची नोंदणी होत नव्हती. कासट हे आमदार विरोधी गटात गेले यानंतर झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नाट्यमयरीत्या घडामोडी होऊन कासट यांनी खंडेलवाल महाराज यांना एका मताने नगराध्यक्षपदी निवडून आणले. यानंतर खंडेलवाल महाराजांनी कासट यांच्या सल्ल्यानेच काम केले. त्यांनतरही पुन्हा खंडेलवाल महाराज यांना राजीनामा द्यावा लागला व भाऊ पानसरे नगराध्यक्ष झाले. त्यामुळे नगरपरिषदेतील वातावरण नेहमीच अशांत अस्थीर राहत गेले. विकास कामे मागे पडत गेली गटबाजी उफाळत गेली. नगरसेवकांनाच सांभाळण्यात सर्व शक्ती पणाला लागत असे. यामध्ये उपनगराध्यक्ष पद हे काही दिवस अंतर्गत समजूत करून वर्षभरासाठी देण्यात येत होते. मात्र नंतर सहा महिने, शेवटी शेवटी तर दर महिन्याला उपनगराध्यक्ष बदलत असे. या गटबाजीच्या कामकाजाला जनता वैतागली होती. नगरपरिषदेच्या या बॉडीला त्यांच्या पाच वर्षाच्या कालखंडापेक्षा जास्त कार्यकाल लाभला.

आ. बाळासाहेब थोरात हे दुसर्यांदा विधानसभेवर निवडून गेले. मात्र यावेळेस ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आमदार झाले. त्यांनी त्यानंतर झालेल्या 1991 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर नगरपरिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला व सदर निवडणूक पूर्ण बहुमताने काँग्रेस पक्षाने जिंकली. डॉ. सुधीर तांबे हे नगराध्यक्ष झाले. यानंतर नगरपरिषदेमधील राजकीय गटबाजी उलथापालथी पूर्णपणे थांबल्या. विकास कामांना जोर आला. डॉ. सुधीर तांबे यांच्या कार्यकाळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भूमिगत बंधारा बांधण्यात आला. याचा सकारात्मक फायदा होऊन शहरातील पाणीटंचाई कमी झाली. पोहण्याचा तलाव, जलशुद्धीकरण प्रकल्प, नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांच्या नवीन इमारती, चौक सुशोभीकरण, महात्मा फुले, लालबहादूर शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतळे उभारण्यात आले. शहरातील नगरचना विभागानुसार नियोजन होऊन बांधकामावर लक्ष देणे देऊ लागले. नवनवीन रस्ते गटारी यांची कामे होऊ लागली. जकात उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न झाले. यामुळे जकात चोरी कमी होण्यास मदत झाली. जकातीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याने युती शासनाने जकात कर बंद केल्यानंतर जे अनुदान देऊ केले त्यामध्ये इतर नगर परिषदेच्या तुलनेत भरघोस अनुदान येऊ लागले. पाणीपुरवठा विभागातील मेंटेनन्स खर्चात कमालीची कपात झाली. उत्पन्न वाढीमुळे नगरपरिषदेच्या कर्मचार्यांचे पगार वेळेवर होऊ लागले. अनेक विकास कामे शासकीय अनुदान मिळवून करता आले. नगरपरिषदेमध्ये राजकीय स्थिरता प्राप्त झाली. याचवेळी मात्र जिल्हा व राज्यात गटातटाच्या राजकारणाने नगर परिषदेमध्ये अस्थिरता असल्याचे जाणवत होते. गटातटाचे राजकारण व स्थिरपक्षीय राजकारण यामधील सकारात्मक बदल संगमनेरकरांना चांगलाच जाणवू लागला. डॉ. सुधीर तांबे यांनी काम करताना सर्वांना विश्वासात घेत कार्यभार सांभाळला. नगरसेवकांनी केलेली अतिक्रमणे काढण्यासही मागे पुढे पाहिले नाही. त्यामुळे शहरांमध्ये एक प्रकारे शिस्त जाणवू लागली.

या निवडणुकीत महायुतीमध्ये विसंवाद नसून एकत्रितरित्या परिवर्तनासाठी सर्व उमेदवार विडणुकीला सामोरे जाणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. महायुती नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार सर्वसमावेशक व प्रभावी देणार आहे. सर्वांना योग्य संधी देवून सर्वांचा मान ठेवून एकत्रितरित्या ही निवडणुकी विजयी करणार असल्याचेही खताळ म्हणाले. महायुतीकडून यावेळी नवख्या उमेदवारांचा किंवा आघाडीकडून नाराज असलेल्या उमेदवारांचा भरणा अधिक असल्याची शक्यता आहे. परंतू तरीही महायुती भक्कमपणे या निवडणुकीला सामोरे जात आहे.
डॉ. तांबे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळानंतर झालेल्या निवडणुकीतही काँग्रेस पक्षाने आपल्या चिन्हावर निवडणूक लढवली. या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ कायद्यात बदल करून एक एक वर्षाचा ठरवला गेला. 1996-97 मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवले. इतर निवडून आलेल्या अपक्ष नगरसेवकांना घेऊन आघाडी करीत कारभार केला. दिलीप पुंड पहिल्या वर्षासाठी नगराध्यक्ष झाले. त्यानंतर कैलास लोणारी नगराध्यक्ष झाले. कैलास लोणारी यांना एक वर्षापेक्षा जास्त कालावधी मिळाला. रंगार गल्ली येथे भाजी मार्केट व्हावे या साठी आंदोलने झाली यामध्ये गल्लीतील वादातून एका माथेफिरूने नगराध्यक्ष कैलास लोणारी यांचेवर जळीत हल्ला केला. त्यामध्ये लोणारी हे बर्यापैकी भाजल्याने औषधोपचारासाठी त्यांना रजेवर जावे लागले. त्यांच्या रजा कालावधीत उपनगराध्यक्ष सोमनाथ अभंग यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार आला. या दरम्यान प्रशिक्षणार्थी आयएएस ऑफिसर प्रविण गेडाम यांच्याकडे मुख्याधिकारी पदाचा पदभार देण्यात आला. त्यांनी शहरातील अतिक्रमणे काढताना बस स्टँड जवळील सर्व टपर्या काढून टाकल्या व नगर रोड ते दिल्ली नाका या दरम्यानची अतिक्रमणे काढून टाकली. यामुळे नवीन नगर रोड खुला होऊन कुरण रोड, नाटकी या भागातील नागरिकांना दळणवळण सोपे झाले. या कार्यकाळातही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीने स्थिर प्रशासन दिले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे जनतेतून निवडून देण्याचा नियम झाला. या निवडणुकीत विश्वास मुर्तडक हे निवडून आले. मात्र ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक मतमोजणीच्या वादामुळे संगमनेरकरांच्या कायम स्मरणात राहिल. मतमोजणी-फेर मतमोजणी यामधून सरते शेवटी विश्वास मुर्तडक निवडून आल्याचे जाहीर झाले. मतमोजणीमध्ये विश्वास मुर्तडक प्रथम क्रमांक, सोमनाथ अभंग दुसर्या स्थानी आणि ज्ञानेश्वर कर्पे तिसर्या स्थानी राहिले. या निवडणुकीचे निकालानंतर शहरात दगडफेक झाली मात्र प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून शांतता कायम केली.

या निवडणुकीनंतरही नगर परिषदेमध्ये बहुमत असूनही विश्वास मुर्तडक यांनी आघाडी करीत कार्यभार पहिला
जनतेतून निवडून आल्याने व अविश्वास ठरावची भीती नसल्याने स्थैर्य प्राप्त होऊन विश्वास मुर्तडक चांगल्या प्रकारे काम करू शकले. संगमनेरचे मोठे क्रीडांगण हे त्याकाळी जिल्ह्याचे गावी नसलेले क्रीडांगण म्हणून नावाजले गेले. त्यांच्या काळात मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडे ते संगमनेर अशी थेट पाईपलाईन तसेच संगमनेर शहरात पाणीपुरवठा पाईपलाईन पीव्हीसी ऐवजी लोखंडी पाईप लाईन टाकण्याचा मोठा प्रकल्प सुरू करण्यात आला. धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना चालू करण्यामागे मुर्तडक यांचे मोठे योगदान आहे. शहरातील पाईपलाईन बदलल्यामुळे पाणीपुरवठ्याचा मेंटेनन्स चा खर्च अत्यल्प होऊ लागला व शहरातील नळाचे खड्डे बंद झाले. मुर्तडक यांनी आपले कार्यकाळात विकास कामाचा मोठा झपाटा लावला होता. घंटागाडी द्वारे घरोघरी कचरा संकलित करून सार्वजनिक कचरा कुंड्या बंद केल्या व शहर स्वच्छतेची नवीन पायाभरणी केली. नवीन नगर रोड, बायपास रोड इत्यादी रस्ते तसेच चौक सुशोभीकरण, चौकामध्ये आयलँड उभारणे, गटारीची कामे मोठ्या प्रमाणात झाली. सुलभ शौचालये, शॉपिंग कॉम्प्लेक्स तसेच मुर्तडक यांच्या कार्यकालात 111 नगरपरिषद कर्मचारी मा. न्यायालयाच्या आदेशान्वये कायम झाले. याचाही मोठा सत्कार कार्यक्रम नेहरू गार्डन येथे पार पडला होता. मुर्तडक यांच्या कार्यकाळानंतर 2012 मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत दुर्गाताई तांबे पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. त्यांनीही बहुमत असूनही इतर नगरसेवकांची आघाडी करून कार्य केले.
संगमनेर नगरपालिकेवर अनेक वर्षापासून बाळासाहेब थोरात किंवा काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आणि वर्चस्व राहिले आहे. जरी अनेक निवडणुकीत पक्षाचे चिन्ह वापरले गेले नसले तरी सत्ता मात्र थोरात आणि तांबे या परिवाराच्या आसपासच होती. परंतु तरीही संगमनेर नगरपालिकेत सुरुवातीपासून काही विरोधकांनी आपला आणि जनतेचा आवाज कायम बुलंद ठेवला आहे. पालिकेतील मनमानी कारभार याविरुद्ध तत्कालीन अनेक नेत्यांनी सत्ताधार्यांवर अंकुश ठेवण्याचाही प्रयत्न केला. यात शंकरलाल जाजू, एस. झेड. देशमुख सर, अॅड. सदाशिव थोरात, समशेरअली जहागीरदार, अशोकराव डाके, राधावल्लभ कासट, जयवंत पवार, अप्पाशेठ केसेकर, कुंदनसिंग परदेशी, श्रीराम गणपुले, अविनाश थोरात, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, कैलास वाकचौरे, जावेद जहागिरदार, वसीम पठाण, भाऊ पानसरे यांचा समावेश होता. या नेत्यांनी संगमनेरकरांच्या वतीने कायम आक्रमक भूमिका घेत एकहाती सत्तेला विरोध दर्शवला.
स्वच्छ व सुंदर संगमनेर हरित संगमनेरचा नारा देऊन त्यांनी नगरपरिषदेसाठी अनेक पुरस्कार मिळवले. नगरपरिषदेचे नाव देशपातळीवर गाजवले. 29 उद्याने उभारून गार्डन सिटी म्हणून संगमनेरचा बहुमान वाढवला. उद्यानांमध्ये ओपन जिम उभारून ज्येष्ठ नागरिक व महिलांना एक व्यायामाची दालने तयार केली. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. महिला नगराध्यक्ष झाल्याने इतर महिला नगरसेविकांनाही सक्षमपणे काम करता येऊन त्यांनी महिलांची प्रतिष्ठा वाढवली. नगरसेविका महिलांना सन्मानाने संबोधले जाऊ लागले. यानंतरच्या निवडणुकीत कायद्यात बदल होऊन नगराध्यक्ष हे नगरसेवकांमधून निवडून देण्याचा व कार्यकाल हा अडीच अडीच वर्षाचा ठेवण्याचा नियम झाला. त्यामध्ये पहिले अडीच वर्ष दिलीप पुंड हे नगराध्यक्ष झाले व त्यानंतर पुन्हा दुर्गाताई तांबे अध्यक्षपदी आल्या.
याही कार्यकाळात शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आली. नंतरच्या कार्यकालात 2016 ला पुन्हा नगराध्यक्ष पद हे जनतेतून निवडून देण्याचा नियम झाला व पुन्हा नगराध्यक्षपदी दुर्गाताई तांबे निवडून आल्या. या कार्यकाळात शहरविकास आघाडी स्थापन करण्यात आलेली होती. शॉपिंग कॉम्प्लेक्स, अद्यावत अनंत फंदी नाट्य गृह, अमृतवाहिनी कॉलेज ते बस स्टॅन्ड या राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक टाकून पथदिवे बसवण्यासाठी दुर्गाताई तांबे यांनी विशेष पाठपुरावा करून तो प्रकल्प मार्गी लावण्यास प्रयत्न केले. वीज वाहक तारा भूमिगत करण्यासाठी बराच पाठपुरावा केला मात्र वीज मंडळाच्या कारभारामुळे हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. संगमनेर शहराच्या कंपोस्ट डेपो मधील कचर्यावर प्रक्रिया करून ऊर्जा निर्मिती व खत निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारून मोठे उत्पन्न मिळवून देण्याकरीता दुर्गाताई यांचे मोठे काम केले आहे. नगरपरिषदेची भव्य प्रशासकीय इमारत तसेच संगणकीकरण कामकाज यामध्ये मोठा वाटा दुर्गाताईंचा आहे. माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम करून अनेक पारितोषिक मिळवली व देश पातळीवर संगमनेरचे नाव मोठे झाले मोठे केले स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कारभार पक्ष व उत्तम कार्यकर्त्यांचा पदाधिकार्यांचा संच असल्यास स्थानिक आघाडी करून कार्यभार चांगल्या प्रकारे करता येतो हे संगमनेर नगर परिषदेच्या 1991 च्या नगरपरिषद निवडणूक पासून आपण अनुभवत आहोत.

मोठ्या प्रतिक्षेनंतर 2025 सालात नगरपरिषदेची निवडणुक होत आहे. अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरत असलेल्या या निवडणुकीचे नेतृत्व पहिल्यांदाच दोन आघाड्यातील दोन युवा नेतृत्वांकडे आहे. दोन्हीही युवा नेते आमदार आहेत. शहर विकास आघाडीचे सारथी आ. सत्यजीत तांबे यांनी नुकताच 2.0 हा विकासाचा नारा देत नागरिकांचे मनातील संगमनेर हा संकल्प मांडला. पुढील 50 वर्षांचे नियोजन करून नागरिकांच्या वतीने ज्या सूचना येतील त्यावर सत्ता आल्यानंतर काम केले जाईल असा ठोस संकल्प मांडला. त्याला नागरिकांकडून देखील मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सत्तेचा अनुभव, अभ्यासू नेतृत्व, नव्या जून्यांचा यावेळी घालण्यात येणारा मेळ ही शहरविकास आघाडीची मोठी जमेची बाजू आहे. ज्या पध्दतीने आ. तांबे विरोधकांवर कोणतीही टिका न करता विकासाची भूमिका मांडत आहेत त्याला सुज्ज्ञ नागिरकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. तर महायुतीचे नेते आ. अमोल खताळ हे देखील मागील एक वर्षांपासून सत्तेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी जिद्दीने काम करत आहेत. लवकरच ते देखील आपल्या विकासाचा अजेंडा मांडणार आहेत. युवकांचे संघटन आणि त्याद्वारे नव्या नेतृत्वाला संधी देऊन शहराच्या विकासाची संकल्पना मांडण्यात येणार आहे. त्यामुळे आता नागरिकांचे लक्ष आता या दोन्ही नेतृत्वाच्या वाटचालीकडे लागले आहे.




















