शनिवारी तीन प्रभागात निवडणूक, उत्सुकता मात्र निकालाची

0
17

युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेतील तीन जागांसह जिल्ह्यातील तीन नगरपरिषद व एक नगरपंचायत क्षेत्रांमध्ये शनिवारी (20 डिसेंबर) होणार्‍या मतदान व रविवारी (21 डिसेंबर) सर्व 12 पालिकांसाठी मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी 18 ते 22 डिसेंबर या कालावधीत विशेष आदेश जारी केले असून, संबंधित कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

संगमनेर शहरातील तीन प्रभागात शनिवार 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने या ठिकाणची तयारी पूर्ण केली आहे. प्रभाग एक सेवा समितीचे उमेदवार दिलीपराव पुंड, महायुतीचे उमेदवार मुन्ना पुंड, प्रभाग क्रमांक दोन मध्ये सेवा समितीच्या अर्चना दिघे, महायुतीच्या इंदिरा नामन तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुवर्णा मस्के आणि प्रभाग 15 मध्ये सेवा समितीच्या पठाण नसीमबानो ईसहाकखान व इतर दोन अपक्ष असे उमेदवार रिंगणात आहेत.
यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरत ठरणार आहे ती म्हणजे प्रभाग एक मधील लढत. अनेक वर्षांच्या कालखंडानंतर संगमनेरची निवडणूक रंगतदार होत आहे. पहिल्यांदाच दोन प्रभावी पक्ष, आघाड्या समोरासमोर उभ्या ठाकलेल्या आहेत. आ. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समिती विरुद्ध आ. अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुती असा हा संघर्ष आता अंतिम टप्प्यात आला आहे. या संपूर्ण निवडणुकीत आरोप, प्रत्यारोप, विकास कामांचा श्रेयवाद, पैशांचा पाऊस, कुरघोड्या, घराणेशाहीचा गळून पडलेला मुद्दा, सोबत राहून जिरवाजीरवी असे सर्व यांची देही याची डोळा मतदारांनी पाहिले.
नगराध्यक्ष पदाच्या सेवा समितीच्या उमेदवार मैथिली तांबे व महायुतीच्या उमेदवार सुवर्णा खताळ अशा दोन राजकीय कुटुंबातील उमेदवार पहिल्यांदाच समोरासमोर उभ्या होत्या. दोन्ही राजकीय कुटुंबातील उमेदवार असल्याने कोणीही घराणेशाहीवर बोलले नाही. मतदारांनी 2 डिसेंबर रोजी यातील एका घराण्याच्या पारड्यात मत टाकले आहे मात्र ते घराणे कोणते याचा फैसला याच रविवारी होणार आहे. सोबतच आधी झालेल्या 27 नगरसेवक पदाची निवडणूक व शनिवारी होत असलेल्या तीन प्रभागातील निवडणुका अशा 30 नगरसेवक व एक नगराध्यक्ष अशा सर्व उमेदवारांच्या मतदानाची एकत्रित मोजणी रविवारी होणार आहे. त्यामुळे जेव्हढे लक्ष शनिवारी होणार्‍या मतदानाकडे लागले आहे त्या पेक्षा जास्त उत्सुकता रविवारच्या निकालाकडे लागली आहे.
येत्या रविवारी होणार्‍या निकालाच्या पार्श्वभूमीवर व निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सार्वजनिक शांतता अबाधित राहावी आणि मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
रस्त्यावर किंवा रस्त्याने जाणार्‍या कोणत्याही मिरवणुकीत अथवा जमावात गैरशिस्त वर्तनास मनाई करण्यात आली आहे. ठरवून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त किंवा निश्चित वेळेच्या बाहेर मिरवणूक, रॅली किंवा सभा काढण्यास मनाई करण्यात आली आली. तसेच मिरवणूक, जमाव तसेच प्रार्थना स्थळांच्या परिसरात गर्दी करून अडथळा निर्माण करण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक रस्ते, घाट, धक्के, स्नान घाट, देवालये, मशिदी, दर्गे तसेच लोकांच्या ये-जा असलेल्या ठिकाणी गोंधळ व बेशिस्त वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही सार्वजनिक किंवा रस्त्यालगतच्या ठिकाणी विनापरवाना वाद्ये, ढोल-ताशे, कर्कश संगीत वाजविण्यास किंवा गाणी म्हणण्यास, सार्वजनिक ठिकाणी किंवा उपहारगृहांच्या आसपास विनापरवाना ध्वनीक्षेपक (लाऊड स्पीकर) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
वरील आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितां विरोधात प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व निष्पक्षपणे पार पडावी, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here