महिला राखीव नगराध्यक्ष पदासाठी महाआघाडी–महायुतीत प्रचंड हालचाल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पद यावेळी खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे अनेक पुरुष इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. राजकीय पक्षांना देखील यावेळी सक्षम महिला उमेदवार शोधताना कस लागत असल्याचे दिसत आहे. परंतु आता सक्षम आणि प्रभावी महिला म्हणून काँग्रेस आणि महायुती कुणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ घालणार यावर शहरात जोरदार चर्चा आणि पैंजा सुरू झाल्या आहेत.
संगमनेरच्या नगराध्यक्षा म्हणून सौ. दुर्गाताई तांबे यांनी भरीव काम केले आहे. त्यांचा जनमानसातील संपर्क देखील दांडगा आहे. खासकरून महिलांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे त्यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी सर्वत्र चर्चा आहे. नगराध्यक्ष पदाचा दांडगा अनुभव असल्याने यावेळीही नगराध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र नवा उमेदवार देण्याची मागणी पक्षातून होत असल्याने पक्षातून आ. सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे, माजी नगरसेविका सौ. सुनंदाताई दिघे यांची नावे चर्चेत आहेत. तर महायुतीकडून सौ. स्मिता गुणे, सौ. पायल ताजणे, सौ. रेखा गलांडे यांची नावे आघाडीवर आहे.

शहरात 15 प्रभाग, 30 नगर सेवक आणि साठ हजार मतदार आहे. या नगराध्यक्ष पदासह सोळा महिला असणार आहे. दरम्यान शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे तसे नागरी प्रश्न वाढत आहे. अनेक जुने प्रश्न डोके वर काढत असताना नवीन निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी त्या क्षमतेचे नेतृत्व करणारी महिला नगराध्यक्षा म्हणून उमेदवारी देताना राजकीय पक्षांचा कस लागत आहे. इच्छुकांमधील एक नाव वगळता सर्वच नावे नवीन आहेत. मात्र मैथिली तांबे यांच्या पाठीशी आमदार पती, अनुभवी नगराध्यक्षा असणार्या सासू तसेच पाठीशी खंबीरपणे उभे असणारे माजी मंत्री व मामे सासरे बाळासाहेब थोरात यांची भक्कम साथ व पाठबळ ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. सौ. सुनंदाताई दिघे यांनी नगरसेवक व विविध समित्यांचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळले आहे. हा अनुभव देखील त्यांना पुढे जाण्यास लाभदायक ठरू शकतो. तर महायुतीकडून सौ. स्मिता गुणे या विविध क्षेत्रात सहजपणे वावरणार्या, अनेक संस्था, संघटना यांच्याशी संबंधित असणार्या आहेत. त्या उच्च शिक्षीत महिला असून संघाशी संबंधित आहेत. त्यामुळे भाजप, संघ आणि विखे यांचा त्यांना पाठिंबा असल्याने त्यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

दरम्यान महायुतीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविण्यासाठी शिवसेना देखील मोठी आग्रही असल्याने उमेदवार कोण आणि चिन्ह कोणते हा देखील चर्चेचा विषय बनला आहे. भाजप शहराध्यक्षा सौ. पायल ताजणे आणि भाजपच्याच रेखा गलांडे या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. यावेळी उमेदवारी मिळविण्यासाठी महायुती आणि विशेषतः भाजपध्येच मोठी चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार पासून सुरू होत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात नगराध्यक्ष पदाचा चेहरा समोर येणार आहे.
दोन्ही आघाड्यांमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवाराच्या नवावर शिक्का मोर्तब झाले तरी दोन्ही बाजूने पत्ते अद्याप खुले करण्यात आले नाही. कोण पहिले उमेदवारी जाहीर करतो यावर देखील बरेच काही अवलंबून आहे. असे असले तरी पुढील दोन ते तीन दिवसान नगराध्यक्षपदाचा संभ्रम दुर होणार आहे.






















