आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास चक्का जामचा इशारा

युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर – सुरक्षित सुसंस्कृत व वैभवशाली असलेल्या संगमनेर शहरामध्ये प्रशासकीयराजमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली आहे, अनियमित लाईट व पाणीपुरवठा याचबरोबर अवैध फ्लेक्सबाजी, मोकाट जनावरांच्या त्रासाला कंटाळून संगमनेर शहरातील नागरिकांनी नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढला. येत्या आठ दिवसांमध्ये प्रभावी उपाययोजना करा अन्यथा भव्य आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

संगमनेरमधील नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सोमेश्वर दिवटे, गजेंद्र अभंग, बादल जेधेे, शैलेश कलंत्री, शुभम परदेशी, सिद्राम दिड्डी, निखिल पापडेजा , हैदर आली, संदीप लोहे, नाना वाघ, डॉ. दानिश पठाण, सतीश आहेर, अॅड. प्रकाश कडलग, किरण पाटणकर, मंगला बाळसराफ, सलीम रंगरेज, वैशाली आडेप, अफजल शेख, अभय खोजे, नूर मोहम्मद शेख, अंबादास आडेप, सुभाष दिघे, एकनाथ श्रीपाद, सचिन खाडे, गोपी जहागीरदार, अलोक बर्डे, प्रमोद गणोरे, जावेद शेख, प्रवीण दीड्डी, बाळासाहेब पवार, निरंजन सातपुते, कमलेश सोनवणे ,तुषार पवार, विशाल सस्कर, नदीम कुरेशी, मुजीब खान, बालम पठाण, मुन्ना शेख, सौ. प्रमिला अभंग, वैशाली बर्गे, सुरेश झावरे, संतोष सातपुते, सिकंदर शेख, संतोष मुर्तडक, तुकाराम शिरोळे, नितीन अभंग, ईश्वर फाफळे, सुनील सस्कर, गीता सस्कर, विजय पवार, सुनिता कांदळकर आदींसह विविध नागरिक उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरासाठी थेट निळवंडे धरणातून पाईपलाईन कार्यान्वित झाली मात्र सध्या शहरांमध्ये अपूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तो सुरळीत व्हावा. स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर असणार्या शहरात सध्या खूप अस्वच्छता वाढली आहे. यामुळे डास वाढले असून आजाराचे प्रमाण वाढले आहे. शहरातील स्ट्रीट लाईट वेळेवर सुरू होत नाही.
कचरा उचलला जात नाही. अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहे. अनेक विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या लोंबकळलेल्या आहेत. शहरांमध्ये मोकाट गाई, कुत्रे, डुकरे वाढले असून या प्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा. तसेच सुलभ शौचालय, मुतारी यांची स्वच्छता नियमितपणे करावी. तेथे नळ जोडणी करावी. शहरांमध्ये अनेक रस्त्यांची खड्डेमय अवस्था झाली असून हे सर्व खड्डे तातडीने बुजवावे तसेच साईड पट्ट्यांवरील माती उचलून रस्ते स्वच्छ ठेवावेत. संगमनेर शहरात अनेक ठिकाणी अनाधिकृत राजकीय फ्लेक्स लागलेले आहेत जे मागील सहा महिन्यापासून लोक कळत आहे त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. हे सर्व फ्लेक्स तातडीने काढले जावेत. तसेच संगमनेर शहरांमध्ये स्वच्छतेसह नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सर्व आंदोलकांनी नगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. यानंतर मुख्याधिकारी श्रीमती धनश्री पवार, नगरपालिकेचे विविध विभाग प्रमुख यांनी निवेदन स्वीकारून तातडीने उपाययोजना करू असे आश्वासन दिले. येत्या आठ दिवसांमध्ये जर या समस्या सुटल्या नाहीत तर शहरातील नागरिक चक्काजाम आंदोलन करतील असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला. यावेळी विविध युवक कार्यकर्ते व महिला यांनी आक्रमक होत नगरपालिकेच्या कामकाजाचे वाभाडे काढले.






















