नगरपालिकेची स्वच्छता विभागाची वाहने धोकादायक स्थितीत !

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्यावतीने शहरातील स्वच्छता राखण्यासाठी ट्रॅक्टर, छोटा हत्ती, टेम्पोच्या साह्याने कचरा उचलला जातो. उचललेला कचरा संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोमध्ये साठवला जातो. परंतु यासाठी वापरण्यात येणार्या गाड्या या खटारा, बिघाड झालेल्या, गळक्या असतात. तर आता चार चाकी गाडी तीन चाकावरच चालवून अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक अपघाताची घटना घडली होती. मात्र या गंभीर प्रश्नावर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
संगमनेर नगरपरिषदेवर मागील तीन वर्षांपासून प्रशासक राज आहे.

तत्कालीन व आत्ताचे मुख्याधिकारी चांगले काम करत असले तरी इतर अधिकारी, कर्मचार्यांवर कुठलाही वचक असल्याचे दिसत नाही. संगमनेरात शहरात पुरेशा स्वच्छते अभावी डासांचे साम्राज्य वाढत आहे. त्यातून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता तर याच स्वच्छता विभागाच्या निकृष्ट वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिघाड झालेले किंवा एखादे पार्ट निकामी झाले तरी असे वाहने कचरा उचलत सांडवत रस्त्यावर धावत असतात. दरम्यान कचरा वाहतूक करणार्या एका ट्रॅक्टरचे पुढील एक चाक गेल्या काही दिवसांपासून खराब झाले आहे. त्या चाकाची दुरूस्ती करण्याऐवजी ते चाक एका बाजूला वरती करून तीन चाकावरच ट्रॅक्टर चालविला जात आहे. अचानक काही घडल्यास या गाडीवर नियंत्रण मिळविणे चालकासाठी कठिण होईल. तसेच त्यातून अपघाताची शक्यता देखील निर्माण होते. असा अपघात एखाद्याच्या जीवावर देखील बेतण्याची शक्यता आहे.

एकवेळ खाजगी वाहने अशा पद्धतीने चालविली जात असेल हे समजण्यासारखे आहे परंतू शासकीय वाहने अशा पद्धतीने रस्त्यावरून चालत असेल आणि त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हे अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. कचरा वाहनारी वाहने ही जुनाट व मध्येच नादुरूस्त होत असतात. अनेकवेळा ती ढकलावी देखील लागतात. कचरा उचलणार्या ठेकेदाराकडून सुद्धा वाहनांची पुरेशी देखभाल केली जात नाही. त्यामुळे असे चारचाकी वाहने तीन चाकावर चालतांना दिसतात. सदर ट्रॅक्टर गेल्या अनेक दिवसांपासून तीन चाकांवर चालत आहे. सोशल माध्यमांवर देखील या संदर्भात चर्चा होत असतांना देखील पालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होते.

ओला-सुका कचर्यावरून त्याचबरोबर काही प्रभागात, काही गल्ल्यांमध्ये घंटागाडी वेळेवर येत नसल्यानेही नागरीकांमध्ये नाराजी होते. अनेकवेळा या वाहनांवरील कर्मचार्यांची अरेरावी वर्तन वादाला कारणीभूत ठरते. अनेक ठिकाणी अर्धवट कचरा उचलला जातो. या खराब वहानातून तो अनेक ठिकाणी खाली देखील पडतो.
खाजगी वाहनासंदर्भात काही अडचणी असल्यास पोलीसांकडून तात्काळ कारवाई होते. मात्र शासकीय कामासाठी वापरणारे वाहने कालबाह्य, नादुरूस्त वाहने बिनदिक्कतपणे अपघाताला निमंत्रण देत रस्त्यावरून वाहत असताता. त्याकडे पोलीसांचे मात्र सोयीने दुर्लक्ष होते. गेल्या काही दिवसांपासून शहरात चर्चीला जात असणार्या या तीन चाकी टॅ्रक्टरवर त्वरीत कारवाई करून किंवा सदर ट्रॅक्टरची दुरूस्ती करून तरच त्याद्वारे कचरा उचलावा अशी मागणी होत आहे. स्वच्छता विभागाचे कर्मचारी, सुपरव्हायजर, ठेकेदार यांनी या वाहनांबाबत अधिक काळजी घेऊन शहरातील कचरा उचलण्याचे नियोजन करावे. अन्यथा काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी पालिकेने घ्यावी अशी संतप्त मागणी शहरातील नागरीकांकडून केली जात आहे.