नव्या-जुन्यांचा समन्वय साधत नगराध्यक्ष मैथिली तांबे यांचा निर्णय

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या नुतन कारभार्यांची निवड आज नगरपालिकेच्या रामकृष्ण सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत करण्यात आली. नगराध्यक्षा सौ. मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विषय समिती सभापतींच्या निवडी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्या.
यामध्ये आरोग्य समिती सभापती म्हणून किशोर टोकसे, पाणीपुरवठा समिती सभापती मुजीब पठाण, शिक्षण समिती सभापती अनुराधा सातपुते, महिला व बालकल्याण समिती सभापती सरोजिनी पगडाल, बांधकाम समिती सभापती किशोर पवार तर नियोजन व विकास समिती सभापती म्हणून नूरमोहम्मद शेख यांची निवड करण्यात आली आहे.

संगमनेर नगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीला मोठे यश मिळाले होते. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर थोरात-तांबे यांनी समन्वय साधत स्वीकृत नगरसेवक म्हणून सोमेश्वर दिवटे, रचना मालपाणी व जावेद पठाण यांची निवड केली, तर उपनगराध्यक्षपदी नूरमोहम्मद शेख यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर सोमवारी विषय समिती सभापतींच्या निवडी जाहीर झाल्या. नुतन आरोग्य सभापती किशोर टोकसे, बांधकाम सभापती किशोर पवार आणि नियोजन व विकास सभापती नूरमोहम्मद शेख हे अनुभवी नगरसेवक आहेत. तर शिक्षण सभापती अनुराधा सातपुते, महिला व बालकल्याण सभापती सरोजिनी पगडाल आणि पाणीपुरवठा सभापती मुजीब पठाण हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समतोल साधत या निवडी केल्याने नगरपालिकेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नगरपालिकेतील सर्व नुतन कारभार्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा संगमनेरकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


















