प्रभाग ३ आणि ४ मध्ये चौरंगी संघर्षाची चिन्हे

0
352

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर शहरातील उपनगराने विस्तारलेला प्रभाग म्हणून तीन आणि चार कडे पाहिले जाते. या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असली तरी अजून विकासाला मोठा वाव आहे. यावेळी प्रभाग तीन मधील दोन्ही वार्डात नवख्या उमेदवारांमध्ये मुकाबला रंगणार आहे. तर प्रभाग चार मध्ये दोनी प्रभावी पक्षांसमोर राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवाराचे तगडे आव्हान उभे राहिले आहे. प्रभाग चार सर्वसाधारण महिला गटात मात्र ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने दमदार महिला उमेदवार दिला आहे तर इतर पक्ष व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावून पाहत आहे.


प्रभाग क्रमांक 3 मध्ये
एकूण मतदार संख्या – 4117 आहे. यात अ.जा.- 264, अ.ज.- 133 व इतर असे मतदार आहेत.
व्याप्ती – श्रमपरीहार कॉलनी, आनंद नगर, स्वामी समर्थ नगर, मधुबन कॉलनी, पारीजात कॉलनी, भरत नगर, माऊली कृपा कॉलनी.
उत्तर – साई श्रद्धा चौक ते तिरंगा चौक ते कोंडाजी सातपुते यांचे घर, मालदाड रोड ते शशिकांत अभंग यांचे गोडाऊन ते साईनाथ कृषी भांडारपेस्ट आग्नेय कॉर्नर ते सर्व्हे नंबर 131 (उत्तर बाजू) ते आग्नेय दिशेने बारेकर यांचे शेडचा नैऋत्य कॉर्नर ते मारुती मंदिर, पावबाकी रोड पर्यंत.
पूर्व – मारुती मंदिर, पावबाकी रोड ते श्रीराज बंगला ईशान्य कॉर्नर, पावबाकी रोड पर्यंत
दक्षिण – श्रीराज बंगला ईशान्य कॉर्नर, पावबाकी रोड ते रणजित देशमुख यांच्या घराचा ईशान्य कॉर्नर ते सातपुते गल्ली रोड, घोलप हॉस्पिटल, मालदाड रोड पर्यंत.
पश्चिम – घोलप हॉस्पिटल, मालदाड रोड ते त्रिमुती चौक, मालदाड रोड ते आदिवासी मुलांचे वसतीगृह ते साईश्रध्दा चौक.
तर प्रभाग क्रमांक- 4
मतदार संख्या एकूण-4539
यात अ.जा.- 339, अ.ज.-41 व इतर
व्याप्ती – शिवाजी नगर, रेंगे गार्डन परीसर, मेहेर मळा, जानता राजा मैदान परीसर, विद्या नगर, सौभाग्य मंगल कार्यालय.
उत्तर – दिवटे किराणा, नाशिक पुणे हायवे ते जयहिंद सर्कल (ट्राफिक आयलँड), मालदाड रोड ते घोलप हॉस्पिटल, सातपुते गल्ली रोड ते रणजित देशमुख यांच्या घराचा ईशान्य कॉर्नर ते श्रीराज बंगला ईशान्य कॉर्नर, पावबाकी रोड पर्यंत.
पूर्व – श्रीराज बंगला, ईशान्य कॉर्नर, पावबाकी रोड ते गुलाब गार्डन चा आग्नेय कॉर्नर, पावबाकी रोड पर्यंत.
दक्षिण – गुलाब गार्डन आग्नेय कॉर्नर, पावबाकी रोड ते अभिनव नगर मार्ग ते जोशी यांचे घर ते भिडे यांच्या घरामागील खुली जागा ते कुलकर्णी यांचे घर ते आनंद ऋषी पतसंस्था ते कर्पे हॉस्पिटल ते नेहुलकर हॉस्पिटल ते ओम साई हॉस्पिटल ते जुनी स्टेट बँक रस्ता, नाशिक पुणे हायवे पर्यंत.
पश्चिम – जुनी स्टेट बँक रस्ता, नाशिक पुणे हायवे ते दिवटे किराणा, नाशिक पुणे हायवे पर्यंत. अशी रचना या दोन्ही प्रभागांची आहे.


प्रभाग 3 अ
या प्रभागात आ. सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष विवेक कासार यांचे पुत्र युवा नेते सौरभ कासार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून मुकेश गोविंद मुर्तडक या नव्या उमेदवाराला रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आपला स्वतंत्र उमेदवार म्हणून अमोल सुभाष मस्के तर अपक्ष म्हणून युवा नेते मिलिंद बाबुराव अभंग मैदानात आहेत.
युवा नेते सौरभ कासार हे व्यवसायिक असून युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. संघटन व विविध सामाजिक उपक्रमाद्वारे ते सातत्याने कार्यरत आहेत. वडील विकास कासार यांचा या प्रभागात असलेला दांडगा जनसंपर्क नगरसेवक व उपनगराध्यक्ष म्हणून केलेले कामे निश्चितच यावेळी सौरभ कासार यांच्या मदतीला येणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांना मानणारा मोठा वर्ग या प्रभागात असून मालदाडरोड त्याचबरोबर या परिसरातील अनेक भागात चांगले रस्ते, पुरेसे पाणी, वृक्षारोपण यासह नागरी सुविधा पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे हा प्रभाग काँग्रेस विचाराचा व पुरोगामी विचाराचा असल्याने सौरभ कासार यांना निश्चित या ठिकाणी मोठी मदत होण्याची शक्यता आहे. महायुतीने एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने महायुतीची मोठी अडचण झाली आहे. मुकेश मुर्तडक शिवसेनेकडून, राष्ट्रवादी काँग्रेस कडून अमोल मस्के असा महायुतीतील दोघांची टक्कर या ठिकाणी होताना दिसत आहे. माघारीपर्यंत निर्णय झाला नाही तर मात्र महायुतीचे दोन आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचा एक अशी तिरंगी लढत सोबतच या प्रभागात मोठे नाव असलेले मिलिंद अभंग ही व्यावसायिक तरुण मैदानात उतरले आहे. त्यांचाही दांडगा जनसंपर्क व्यवसायामुळे परिसरात असलेली वेगळी इमेज याचा देखील फायदा मिलिंद अभंग यांना होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


प्रभाग ब हा महिला वर्गासाठी राखीव असल्याने या ठिकाणी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्या पत्नी शोभा पवार यांना ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी मंगल बाबुराव वर्पे यांना मैदानात उतरवले आहे. मात्र माजी नगरसेविका सुनंदा मच्छिंद्र दिघे पुन्हा एकदा अपक्ष म्हणून मैदानात असल्याने या दोन्ही उमेदवारासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बांधकाम समिती सभापती म्हणून सुनंदा दिघे यांचे काम प्रभावी राहिले आहे. अनेक नागरी सुविधा त्यांनी याठिकाणी उभारल्या आहेत. सर्व घटकांशी त्यांचा संपर्क आहे. मात्र तडजोडीच्या राजकारणामुळे त्यांना डावले असल्याची भावना या ठिकाणी असून त्यांची उमेदवारी कायम राहिल्यास येथे तिरंगी लढतीची शक्यता आहे. धक्कादायक निकाल लागल्यास आश्चर्य वाटायला नको.
प्रभाग चार ब हा सर्वसाधारण पुरुषांसाठी असलेल्या वार्डामध्ये माजी उपनगराध्यक्ष किशोर हिरालाल पवार यांना ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीने माजी नगरसेवक सिद्धाराम दिड्डी यांचे सुपुत्र प्रवीण सिद्राम दीड्डी यांना मैदानात उतरवले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा या प्रभागात आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण अरुण कानवडे हे स्वतः या प्रभागातून उमेदवारी करत आहे. विविध सामाजिक आंदोलनातून ते पुढे आले आहे. महायुती दोन आणि ऑल इंडिया एक अशा तिरंगी लढतीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात व तांबे परिवाराचे एकनिष्ठ राहिलेले युवा कार्यकर्ते सतीश आहेर यांनी अपक्ष उमेदवारी येथे करत मोठे आव्हान उभे केले आहे. तरुणांचे संघटन, विविध उपक्रमातील सक्रिय सहभाग आणि मदतीला धावून जाणारा स्वभाव यामुळे त्यांच्या उमेदवारीला खरेतर पहिल्यापासून पसंती होती. मात्र दबावातून त्यांची उमेदवारी कट झाली. त्यांची उमेदवारी कायम राहिल्यास याठिकाणी तिरंगी, लढत होऊन धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

प्रभाग चार अ
मध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने शिवसेनेचे युवा नेते अमोल कवडे यांच्या पत्नी प्राची अमोल कवडे उर्फ प्राची भानुदास काशीद यांना उमेदवारी दिली आहे. अमोल कवडे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विविध आंदोलनात सामाजिक कार्यात विविध उपक्रमात सार्वजनिक उत्साहात मोठे योगदान दिले आहे. या प्रभागात त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, प्रत्येक वर्गाशी असलेली वैयक्तिक मैत्री, ओळख यामुळे त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीला या ठिकाणी नागरिकांची पहिली पसंती मिळताना दिसत आहे. मराठा आंदोलनात देखील कवडे यांचा सक्रिय सहभाग आहे. दरम्यान महायुतीत झालेल्या फाटाफुटीमुळे या ठिकाणी शिवसेनेने कविता फटांगरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चंद्रकला शंकर गायकवाड असे दोन उमेदवार उभे केले आहे. तर अपक्ष म्हणून विद्या प्रकाश कडलग या मैदानात आहेत. एकूण हा प्रभाग आघाडीसाठी सेफ माणला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here