तरुणाई सज्ज, ज्येष्ठ नेते मार्गदर्शकाच्या भूमिकेत ?

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेली संगमनेर नगरपालिकेची निवडणूक अखेर जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. यामुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढू लागली आहे. आता माघार नाही या निर्धाराने अनेक कार्यकर्ते मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत.
निवडणूक वारंवार पुढे ढकलल्याने पूर्वी तयारी केलेल्या अनेक कार्यकर्त्यांचा उत्साह ओसरला होता. अनेकांनी प्रचाराची आखणी, जनसंपर्क तसेच शुभेच्छा बॅनर, कार्यालय उभारणी आदींसाठी मोठा खर्च केला होता. मात्र आता दिवाळीचे औचित्य साधून इच्छुकांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शुभेच्छा बॅनर, सोशल मीडियावरील सक्रीयता आणि पक्षातल्या गाठीभेटींनी संगमनेरात राजकीय तापमान वाढले आहे.

तरुणाईचा मोठा भरणा – नव्या चेहऱ्यांकडे लक्ष
या निवडणुकीत पहिल्यांदाच महायुतीकडे उमेदवारांच्या रांगा लागणार आहेत. विशेष म्हणजे, तरुण कार्यकर्त्यांची सक्रियता उल्लेखनीय आहे. राजकारणात नवीन रक्त आणण्याची तयारी दोन्ही आघाड्यांकडून सुरू असून, तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

थोरातांच्या पराभवानंतर राजकीय गणितात उलथापालथ गेल्या अनेक दशकांपासून संगमनेर नगरपालिकेवर काँग्रेसचा प्रभाव राहिला असून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सत्ता टिकवून ठेवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत झालेल्या त्यांच्या पराभवानंतर तालुक्याचे तसेच शहराचे राजकीय गणित पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.
हि निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी असली तरी, प्रत्यक्षात सामना बाळासाहेब थोरात विरुद्ध विरोधक असा रंग घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून पुन्हा सत्ता राखण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, विरोधक देखील नगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज आहेत. बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस संघटन अद्याप मजबूत असले तरी, बदनाम किंवा निष्क्रिय नेत्यांना बाजूला ठेवून नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतल्यास थोरातांना मोठे राजकीय संतुलन साधावे लागेल. त्याचबरोबर अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे जरी स्वतंत्रपणे कार्यरत असले तरी काँग्रेस विचारधारेचे असल्याने त्यांचा सहभागही निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार अमोल खताळ हे महायुतीच्या बाजूने आघाडीवर असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आता पालिका निवडणुकीसाठीही रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर युवाशक्ती असून, तिच्या योग्य वापरावर आणि नेतृत्वाला दिलेल्या संधीवर महायुतीचा विजय अवलंबून राहणार आहे.

संपूर्ण शहरात आगामी निवडणुकीची चर्चा रंगली असून, काँग्रेस व महायुती दोन्ही गटांतील नेत्यांची हालचाल सुरू झाली आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण झाली असून, नगरपालिकेतील सत्ता कोणाच्या हाती येणार हे पाहण्यासाठी संगमनेरकरांची नजर निवडणूक आयोगाच्या घोषणा तारखेकडे लागली आहे. राजकारणातील तापमान वाढत असताना, संगमनेरची ही निवडणूक ज्येष्ठांचा अनुभव विरुद्ध तरुणांचा उत्साह अशी ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.