इच्छुकांना रोखणे आणि बंडखोरी थांबविण्यासाठी धडपड

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर शहरात नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुकांनी उमेदवारीसाठी वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावल्याने शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शहरात काँग्रेसप्रणित शहर विकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच मुख्य लढत रंगण्याची शक्यता असून, इतर छोटे पक्ष आणि अपक्ष कोणती भूमिका घेणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक इच्छुक शहर विकास आघाडीकडे असल्याचे दिसून येत असून, या आघाडीची सर्व सूत्रे आमदार सत्यजित तांबे यांच्या हाती आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी अनेकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. कोणत्या प्रभागात कोणता चेहरा उतरवायचा, याबाबत तांबे समर्थकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे महायुतीतही उमेदवारीसाठी मोठी चढाओढ सुरू आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, येथील घडामोडींचा बारकाईने आढावा घेत आहेत. आमदार अमोल खताळ हेही प्रत्येक इच्छुकाचा तपशीलवार आढावा घेत असल्याने महायुतीतही स्पर्धा वाढली आहे.
निवडणुकीची घोषणा होताच अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. काहींच्यासमोर मात्र कोणता झेंडा घेऊ हाती? असा प्रश्न उभा राहिला आहे. मागील नगरपरिषदेत काँग्रेसने वर्चस्व राखले होते. मात्र यावेळी सर्वच प्रभागांत उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माजी नगरसेवकांपैकी सुमारे 10 ते 12 जणांनी पुन्हा तयारी सुरू केली असून, काही माजी नगरसेवक महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
महायुतीतील काही संभाव्य उमेदवारांना तिकीट न मिळाल्यास अपक्ष किंवा शहर विकास आघाडीकडून लढण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांना उमेदवारी देताना मोठे गणित मांडावे लागणार आहे.
उमेदवारी मिळावी म्हणून अनेक इच्छुकांकडून प्रचारयंत्रणा, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि ‘अर्थपूर्ण’ साथ मिळवण्याची चढाओढ सुरू झाली आहे. राज्यात सत्ता असली तरी संगमनेरमध्ये व्यक्तीकेंद्रित राजकारण असल्याने प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची लढत ठरते. नगरपालिका निवडणूकही त्याला अपवाद ठरणार नाही. आरक्षणामुळे काही इच्छुकांचा ‘चान्स’ गेल्याने काहींनी आपल्या सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा चंग बांधला असून, त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली आहे.
नगराध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूंनी उमेदवारांची अंतर्गत निश्चिती झाल्याचे समजते. मात्र ही नावे प्रथम कोण जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत संगमनेरच्या राजकारणाचा तापमानपारा आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे. त्यामुळे सोशल मिडियावर इच्छुकांच्या विविध आश्वासक घोषवाक्याच्या पोस्टचा भडिमार सुरू आहे. फुकट किंवा अवघ्या काही रुपयांत बनवून मिळणार्या या पोस्टमुळे काही नवखे किंवा ज्यांना कसली निवडणूक आहे हे देखील माहिती नसताना त्यांच्या पोस्टमधून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. पक्ष नाही, चिन्ह नाही, कुणाचा पाठिंबा आहे माहिती नाही परंतु ते देखील प्रचारात मोठी आघाडी घेत आहे. सोशल मिडियातील इच्छुकांची संख्या पहाता दोन्ही आघाडीच्या नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. परंतु काही जण केवळ हवा करण्यासाठी हा दिखावा करीत आहे. दरम्यान अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे एकिकडे दोन्ही बाजूने उमेदवार निश्चित करण्यासाठी दबाव वाढत असताना या वाढत्या इच्छुकांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी देखील पक्षनेतृत्वाला विचार करावा लागत आहे.





















