महाआघाडी (शहर विकास आघाडी) – महायुतीत उमेदवार निवडीची धावपळ

बहुप्रतिक्षित असलेल्या नगरपरिषदा निवडणूकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. तब्बल नऊ वर्षानंतर संगमनेर नगर परिषदेसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची मोठी भाऊगर्दी होताना दिसत आहे. त्यातच शहरात पहिल्यांदाच दोन मजबूत सत्ता केंद्र निर्माण झाल्याने दोन्ही बाजूने उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. 10 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्याची तारीख असल्याने महाआघाडी आणि महायुतीकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया जलद गतीने राबविण्यात येत आहे. पुढील दोन दिवसात दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहे. तर इतर छोटे मोठे पक्ष आणि उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या अपक्षांची देखील यावेळी मोठी भाऊगर्दी पाहायला मिळणार आहे.
महाआघाडी किंवा शहर विकासाकडून आणि महायुतीकडून कुणाच्या कपाळी उमेदवारीचा टिळा लागणार, आणि उमेदवारी न मिळाल्याने कुणाचा उन्हाळा (अपेक्षांचे) होणार हे लवकरच समजेल.

दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी देखील यावेळी मोठी चुरस निर्माण झाली आहे. विधानसभेतील सत्तांतरानंतर विरोधकांच्या आशा पल्लवीत झाल्याने यावेळी नगराध्यक्ष पदासाठी देखील मोठी हातघाईची लढाई होणार असल्याने तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होत आहे. मात्र हा तुल्यबळ उमेदवार कोण? हे पुढील दोन दिवसात जाहीर होणार आहे. त्यामुळे तूर्तास मतदारांना वेट अँड वॉच त्या भूमिकेत राहावे लागणार आहे.
संगमनेर शहरात 15 प्रभाग आणि 30 नगरसेवक, त्याचबरोबर थेट जनतेतून नगराध्यक्ष अशी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाआघाडी किंवा होऊ घातलेली शहरी विकास आघाडी त्याचबरोबर महायुती यांच्यामधील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत अद्यापही एकमत झाल्याचे दिसत नाही. विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे व विधानसभा आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली ही नगपरिषदेची निवडणुक लढविली जात असली तरी महाविकास आघाडीतील जागा वाटप व उमेदवारांची निवड ही माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अनुमतीनेच होणार आहे. तर महायुतीची उमेदवारी ही आमदार अमोल खताळ बरोबरच ना. राधाकृष्ण विखे व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या अनुमतीने होणार आहे. दोन्ही बाजूने उमेदवारीसाठी पात्रता ही जनमानसातील स्थान यावरच भर देण्यात येत असल्याचे समजते.

महाविकास आघाडीला या विधानसभेत फटका बसून पराभव पत्करावा लागल्याने यावेळी ते ताकही फुंकून पिले जात आहे. विधानसभेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे खास करून प्रयत्नशील आहे. याबाबत त्यांच्या वेगवेगळ्या बैठका सुरू असून या बैठकीमध्ये प्रामुख्याने विधानसभेतील चुका टाळणे यावरच भर देण्यात येत आहे. विद्यमान नगरसेवकांचा परफॉर्मन्स आणि इच्छुक नगरसेवकांची पात्रता सखोलपणे तपासून ही उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. जातीय समीकरण, पक्षावरची निष्ठा याचबरोबर जन माणसातील त्या उमेदवाराचे स्थान व कर्तृत्व हे प्रमुख निकष यावेळी ठेवण्यात आले आहेत. केवळ नेत्यांच्या पुढे पुढे करणार्या इच्छुकांना यावेळी डावलले जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची या ईर्षेने दोन्ही बाजूंनी प्रयत्न होत असला तरी संगमनेरातील आपली सत्ता कायम राखणे यासाठी बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह संपूर्ण काँग्रेस त्याचबरोबर मित्रपक्ष असलेले शिवसेना उबाठाचे अमर कतारी, संजय फड, पप्पू कानकाटे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे.

विधानसभेत मतदारांनी महायुतीची बाजूने कौल दिला असून हा कौल किंवा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी महायुतीच्या वतीने ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची करण्यात येत आहे. विधानसभेला पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांनी ज्याप्रमाणे बळ दिले त्याप्रमाणे या नगरपरिषद निवडणुकीसाठी देखील विखे परिवार आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीच्या वतीने देखील उमेदवाराची निकष हे जनमानसातील स्थान, कर्तृत्व यालाच महत्व देण्यात येत आहे. याबाबत डॉ. सुजय विखे यांनी इच्छुकांना थेट इशारा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीकडून चांगल्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यता आहे. महायुतीसाठी आमदार अमोल खताळ यांच्यासह शिवसेनेचे विनोद सूर्यवंशी, विठ्ठल घोरपडे, रमेश काळे, भाजपकडून शहराध्यक्ष पायल ताजणे, श्रीराम गणपुले, जावेद जागीरदार, राष्ट्रवादीकडून कपिल पवार, आरपीआय कडून कैलास कासार आदी नेते उमेदवार ठरविणे निवडणुक यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.





















