संगमनेर पंचायत समितीसमोर मनरेगा मजुरांचे टाळ- मृदुंग घेऊन आंदोलन

0
2

तीन महिन्यांचे मानधन रखडले, मजुरांच्या न्यायासाठी लढा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती संगमनेर येथे मौजे मालदाड गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणार्‍या मजुरांनी टाळ मृदुंग घेऊन हरिनामाचा गजर करत प्रशासनाच्या विरोधात आंदोलन पुकारले. या आंदोलनाचे नेतृत्व मालदाड गावचे सरपंच गोरक्षनाथ बाबासाहेब नवले यांनी केले.

मनरेगा अंतर्गत काम करणार्‍या मजुरांवर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पंचायत समिती संगमनेर मार्फत काढण्यात येणारे हजेरी मस्टर दिनांक 2 फेब्रुवारी 2026 पासून काढण्यात आले नसल्याने मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून मजुरांचे मानधन त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नसल्यामुळे संतप्त मजुरांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारापासून टाळ मृदुंगाच्या घरात विविध अभंग म्हणत आंदोलन केले.त्यांनी मजुरांचे मस्टर तात्काळ काढण्यात येतील, तसेच प्रलंबित मानधनाबाबत त्वरित कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना मस्टर काढण्याचे आदेश दिले.

यावेळी बोलताना सरपंच गोरख नवले म्हणाले की, सध्याचे सरकार घोषणा करत आहे मात्र जनतेचे पैसे देत नाही. गोरगरिबांचे पैसे खाणारे हे सरकार असून यांना जाहिरात बाजीसाठी पैसे मिळतात मात्र कष्टाचे पैसे देत नाहीत. आवाज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा आहे. सर्वसामान्यांच्या मनामध्ये सरकार बद्दल राग आहे मात्र सरकारी विरोधात मतदान करूनही अनेक ठिकाणी सत्ताधारी लोक निवडून येतात हा मोठा प्रश्न जनतेला पडला आहे. आमचे पैसे तातडीने द्या अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा सरपंच नवले यांनी दिला गट विकास अधिकार्‍यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. या आंदोलनासाठी मालदाड गावातील नागरिक व मनरेगा मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here