पक्षशिस्तभंग प्रकरणात मेघा भगत यांच्यावर कठोर कारवाई

0
915

राजकीय बंडखोरीची किंमत, मेघा भगत पक्षातून निलंबित !

संगमनेर (प्रतिनिधी )- भाजपाच्या मेघा दिपक भगत यांनी नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केल्याने महायुतीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. मेधा भगत या भाजपच्या मागिल टर्मच्या एकमेव महिला नगरसेवक आहेत. महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा खताळ यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महायुती एकत्र राहील, अशी अपेक्षा होती. मात्र ही उमेदवारी सर्वसमावेशक नव्हती असे महायुतीच्याच गोटातून बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या स्वतंत्र उमेदवारीमुळे महायुतीचे गणित सुरवातीलाच बिघडले होते. दरम्यान भाजपाच्या मेघा भगत यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. माघारीपर्यंत हा अर्ज माघारी घेतला जाईल असे बोलले जात होते. परंतु शुक्रवारी शेवटच्या दिवशी देखील हा अर्ज माघारी न झाल्याने महायुतीमध्ये सर्वकाही अलबेल नाही यावर शिक्कामोर्तब झाले. मेघ भागात यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने पक्षाने त्यांच्यावर तातडीने कारवाई केली आहे. भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी असताना पक्षशिस्त व अनुशासन भंग केल्याप्रकरणी त्यांना तात्काळ पक्षातून निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधीचे नितीन दिनकर यांचे अधिकृत पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे.

२०१६ च्या निवडणुकीमध्ये अनेक भाजप उमेदवारांमध्ये मेघा भगत या एकमेव विजयी झाल्या होत्या. त्यांनी विरोधक म्हणून नगरपालिकेत प्रभावी कामदेखील केले होते. यावेळी त्यांना प्राधान्यक्रमाने उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते मात्र नगरसेवकपद आणि नगराध्यक्ष अशा दोन्ही ठिकाणी त्यांना नाकारल्याने त्यांचे व भाजपाचे कट्टर समर्थक यांच्यात मोठी नाराजी पसरली होती. भगत यांना जाणीवपूर्वक डावलल्याने त्यांनी नगराध्यक्षपदाचा आपला अर्ज कायम ठेवला आहे. याबाबत दिपक भगत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमच्यावर अन्याय झाला आहे. ही उमेदवारी भाजपाची नाही तर आमची वैयक्तिक आहे. परंतू आमची ताकद आता निकालातूनच जनतेसमोर येईल असेही भगत यांनी सांगितले. यामुळे नाराज झालेल्या मेघा भगत यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात जात बंडखोरीचा पवित्रा घेतला आणि आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

आमदार खताळ यांच्याकडून उमेदवारी डावलली गेल्याने पक्षांतर्गत अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु, थेट पक्षनेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी करण्याचे मोठे धाडस मेघा भगत यांनी दाखविले. भगत यांच्या या बंडखोरीचे पडसाद आता पक्षांतर्गत जोरदार उमटले असून, भाजपला शिस्तभंगाच्या कारवाई करावी लागली आहे. मेघ भगत यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीतील शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. या कारवाईमुळे आता संगमनेर नगरपालिकेची निवडणूक अधिकच चुरशीची होणार असून भगत यांच्या उमेदवारीमुळे महायुतीत मतविभाजनाचा धोका निर्माण होऊन याचा थेट परिणाम शिवसेनेच्या उमेदवाराला किती प्रमाणात बसू शकतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here