सुवर्णा खताळ, नीलम खताळ यांच्यासह अन्य नावे चर्चेत, आघाडीकडून डॉ. मैथिली तांबे यांचीच होणार का वर्णी ?

नगराध्यक्ष पदासह ७ जणांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुती आणि महाविकास (शहर विकास) आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार असणार, यावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा जोर होता. महायुतीकडून चर्चेत असलेली अनेक नावे बाजूला सारून सुजाता देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची चर्चा होती. पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष एस. झेड. देशमुख यांच्या कन्या व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या पत्नी सौ. सुजाता राजेंद्र देशमुख यांना महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी देण्याचे खात्रीलायक वृत्त आले होते. मात्र आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत वेगळेच ट्वीस्ट बघालया मिळत आहे. नगराध्यक्ष पद महिला राखीव असल्याने, सक्षम व सर्वमान्य महिला उमेदवार शोधणे सर्वच राजकीय पक्षांसाठी मोठे आव्हान ठरत होते. सुरुवातीला महायुतीत पायल ताजणे, स्मिता गुणे, रेखा गलांडे यांसारख्या नावांवर चर्चा झाली होती. परंतु एक वेगळेच समीकरण घेऊन महायुती पुढे येताना दिसत आहे.

आमदार अमोल खताळ यांचे मोठे बंधू कै. संदीप खताळ यांचे पाचवे पुण्यस्मरण नुकतेच पार पडले. त्यानंतर कै. संदीप खताळ यांच्या पत्नी श्रीमती सुवर्णा संदीप खताळ तसेच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांचे नाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी खाजगीत सर्वत्र बोलले जात आहे. दुसरीकडे, आघाडीकडून तांबे परिवारातून उमेदवार असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांच्या नावावार शहर विकास आघाडीकडून चर्चेनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. कै. संदीप खताळ हे थोरात आणि तांबे घराण्याचे अगदी एकनिष्ठ होते. श्रीमती सुवर्णा खताळ यांच्या रूपाने सामान्य घरातील उमेदवार नगराध्यक्षपदाला मिळेल मात्र घराणेशाहीचा आरोप करणार्या महायुतीला घराणेशाहीवर उत्तर शोधावे लागेल. तशीच काहीशी अवस्था सौ. नीलम खताळ यांच्याबाबतीत पहायला मिळेल. आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ या सर्व प्रभागात गाठभेठ घेत असून त्यांचे नावही चर्चेत आहे. त्यांचे मतदान ग्रामपंचायतमध्ये की नगरापालिकेमध्ये अशाही वेगळ्या चर्चा आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि निवेदक सौ. स्मिता गुणे यांनीदेखील नगराध्यक्षपादासाठी जोरदार तयारी केल्याची चर्चा आहे.

शहर विकास आघाडीकडून मैथिली तांबे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या पाठीशी आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. तांबे यांचा मजबूत पाठिंबा असणार आहे. तर महायुतीकडून आ. अमोल खताळ, ना. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती सुवर्णा खताळ किंवा नीलम खताळ म्हणजे खताळ परिवाराच्या उमेदवारीला जोरदार बळ मिळणार आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही गटांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी कोणाच्याही नावाची चर्चा असली तरी आमदार सत्यजीत तांबे आणि आमदार अमोल खताळ यांच्याबरोबरच कार्यकर्त्यांनी देखील प्रचंड गुपीत ठेवले आहे. नगराध्यक्षपदाचे नाव जाणून घेण्यासाठी सोमवारपर्यंत वाट पहावे लागणार असल्याची शक्यता आहे.
नगरसेवकांच्या मुद्द्यावर एककीकडे संगमनेर भाजपामधील अनेक जूने-जाणते निष्ठावंत नेते दाखवत नसले तरी नाराज आहेत. अशीच काहीशी बाजू शहर विकास आघाडीची देखील आहे. प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असून कोणा एकाला तिकीट मिळाल्यास बंडाचे आव्हान शहर विकास आघाडीला जास्त आहे. एकूणच काय तर अगदी इच्छुकांची रांग मुंग्यांप्रमाणे वाढतच असून हवशे-नवशे आपले नशीब आजमावत आहेत. बंडाची भूमिका थंड करण्यासाठी आणि आपल्या डोक्याचा ताण कमी करण्यासाठी शहर विकास आघाडी आणि महायुती आपआपले उमेदवार सोमवार दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी जाहिर करतील असेच चिन्ह आहे. ऑनलाईन पध्दतीने बर्याच इच्छुकांनी फॉर्म भरले असून वेबसाईटवर फक्त सबमीट बटन दाबायचे बाकी आहे. ऑफलाईन पध्दतीने सोमवारीच सर्व उमेदवार आपआपली उमेदवारी जाहिर करतील. आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजीत तांबे यांच्या बैठकांना उधाण आले असून रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत सुध्दा मीटिंगचे सीलसीले सुरू आहेत. अपक्ष उमेदवारांनी देखील तयारी केली असून शनिवारी दुपारर्यंत काही फॉर्म भरले जाण्याची शक्यता आहे. नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी गुप्तपणे गाठीभेटी सुरू केल्या आहेत. अनेकांनी प्रभागनिहाय प्रचारयंत्रणा कार्यान्वित केली असून कामाला लागा अशा आदेशानंतर इच्छुकांनी आपापल्या भागात जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक विभागातील उमेदवारांची संख्या, जातनिहाय संख्या, कोण आपला, कोण बाहेरचा याची गणिते जुळवली जात आहेत. प्रत्येक प्रभागातील उमेदवार आपआपल्या पध्दतीने सॉफ्टवेअरची खरेदी करीत असून आपआपल्या पध्दतीचे अॅनालिसीस महत्वाचे ठरणार आहे.घटक पक्षांमध्ये उमेदवारीबाबत थोडीशी अस्वस्थता कायम असल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीचे सदस्य असलेले शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये नगराध्यक्षपदा बरोबरच नगरसेवक पदाचेही उमेदवार स्वतंत्र लढवत असल्याचे सांगितले आहे.
संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी गेल्या काही वर्षांपासून जोरदार तयारी केल्याने उमेदवारीची प्रचंड संख्या दिसून येते. त्यामुळे आघाडी आणि महायुती दोन्ही बाजूंना इच्छुकांना सामावून घेताना मोठी कोंडी निर्माण झाली आहे. दगाफटका होऊ नये आणि प्रतिस्पर्धी पक्षांना त्याचा फायदा मिळू नये म्हणून दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारी जाहीर करण्यात विलंब केला जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही दोन्ही बाजू ‘वेट अँड वॉच’ भूमिकेत आहेत. उमेदवारी न मिळालेल्यांचा बंडाचा इशारा उमेदवारी जाहीर न झाल्याने किंवा मिळण्याची शक्यता कमी झाल्याने अनेक इच्छुकांनी बंडखोरीचा झेंडा उभारला आहे. अनेक ठिकाणी एकाच प्रभागातून अनेक दावेदार असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे. अनेक निष्ठावंतांनी आपली निष्ठा ‘गुंडाळून’ ठेवत वेगळा मार्ग अवलंबण्याचा इशारा दिला आहे. ही नाराजी आघाडी आणि महायुती दोन्हींसाठी डोकेदुखी ठरत असून, निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाणून घ्या आज अर्ज करणाऱ्या उमेदवारांची नावे ?
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज, शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी नामांकन दाखल प्रक्रिया उत्साहात पार पडली. एका दिवसात नगराध्यक्ष पदासाठी एक तर प्रभागांतून सहा उमेदवारांनी आपापली नामांकने सादर केली.
नगराध्यक्षपदासाठी बेपारी शबाना रईस यांनी आज आपला अर्ज दाखल केला असून, गेल्या सहा दिवसांतील या पदासाठी प्राप्त झालेले हे एकमेव नामांकन ठरले आहे.
याशिवाय विविध प्रभागांमधून आलेल्या नामांकनांमध्ये पुढील उमेदवारांचा समावेश आहे:
प्रभाग क्रमांक ७ (अ): पूजा त्रिलोक कतारी
प्रभाग क्रमांक ७ (ब): नारायण सावळेराम शिंदे
प्रभाग क्रमांक ९ (अ): अतिक कमरुद्दीन इनामदार
प्रभाग क्रमांक १३ (अ): प्रिया विलास खरे आणि कविता अमर कतारी
प्रभाग क्रमांक १३ (ब): अमोल राजेंद्र डुकरे
या सर्व उमेदवारांनी आज आपापली नामांकने दाखल करून निवडणूक प्रक्रियेची रंगत अधिक वाढवली आहे.
प्रभागनिहाय आठ-दहा उमेदवारांची शक्यता यावेळी आघाडी, महायुती, वंचित बहुजन, मनसे, इतर पक्ष तसेच अपक्ष असे मिळून एका प्रभागात आठ ते दहा उमेदवारांची चुरस दिसू शकते. त्यातही महिला उमेदवारांची संख्या यावेळी मोठी असणार आहे. आरक्षणामुळे पुरुषांचे तिकीट कट झाल्याने त्यांच्या पत्नी किंवा कुटुंबातील महिलांना पुढे करून पालिकेत प्रवेश मिळवण्याची तयारी अनेकांनी केली आहे. अनेक इच्छुक तर दोन्ही आघाड्यांशी जवळीक ठेवत, एका आघाडीत तिकीट न मिळाल्यास दुसरीकडे जाण्याचा खुला पर्याय ठेवून आहेत. जातीय समीकरणांचा प्रभाव : प्रभागात अतिक्रमण, वाढती नाराजी जातीय समीकरणांनुसार अनेक इच्छुकांनी स्वतःचा प्रभाव दुसर्या प्रभागात वळवला आहे. त्यामुळे मूळ प्रभागातील इच्छुकांमध्ये अतिक्रमणाच्या आरोपांमुळे प्रचंड नाराजी आहे. अनेक वर्षे पक्षाशी निष्ठा ठेवूनही संधी न मिळाल्याने काही जण विरोधी गटात जाण्यास तयारीत आहेत. नाराजी आणि संभाव्य बंड रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींची चांगलीच धावपळ चालू आहे.




















