संगमनेरमध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांचा धडाकेबाज छापा

0
1590

संगमनेर शहर परिसरात मागील काही दिवसांमध्ये अवैध धंद्यांना मोठा ऊत आला आहे. वाळू तस्करी, गांजा, दारू, मटका, जुगार, याचे केंद्र झपाट्याने वाढत आहे. यात काही राजकीय पुढार्‍यांचा देखील मोठा सहभाग आणि हस्तक्षेप असल्यांचा आरोप वारंवार होत आहे. शहरातील अवैध धंदे, कत्तलखाने, दहशत, दादागिरी कमी केली जाईल किंवा कमी झाली आहे. असे वारंवार सांगितले जात असले तरी आजच्या या कारवाईवरून हा गोरख धंदा किती जोमाने सुरू आहे. हे स्पष्ट होत आहे. ही कारवाई अपवाद राहू नये, तर सुरुवात ठरावी, अशी अपेक्षा आता सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरात मटका या अवैध व्यवसायाला मिळालेल्या बळाला पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने अवघ्या काही मिनिटांत 3 ठिकाणी छापे टाकून 10 लाख 35 हजार 347 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तब्बल 35 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईने शहरात एकच खळबळ उडवून दिली आहे.
विशेष म्हणजे, ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर चालणार्‍या मटक्याच्या टपर्‍यांवर झाली असून यामुळे स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर संशयाचे धुके गडद झाले आहे.
संगमनेर शहर व तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून मटका, जुगार, दारू विक्री, गांजा आणि अन्य अवैध धंद्यांचे जाळे पसरले आहे. अनेक भागांत हे धंदे इतक्या सर्रासपणे सुरू आहेत की, यामागे राजकीय वरदहस्त आणि स्थानिक प्रभावशाली मंडळींचा सहभाग असल्याची कुजबुज सामान्य नागरिकांत आहे.
20 जून 2025 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली तेलीखुंट आणि कोल्हेवाडी रोड येथील अड्ड्यांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. यामध्ये शंकर इटप, सुदर्शन इटप, आशरफ सय्यद, नानासाहेब जाधव, इकबाल शेख, रियाज देशमुख यांच्यासह अनेकांची नावे पुढे आली आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रोकड, मटका तिकीटे, मोबाईल व साहित्य जप्त करण्यात आले.

तेलीखुंट, कोल्हेवाडी रोड, सय्यद बाबा चौक, शिवाजीनगर, मार्केट यार्ड या भागांतून दिवसाढवळ्या मटका व सट्टा सुरू असल्याचे चित्र दिसून येते. हे अड्डे काहींच्या मते फक्त आर्थिक गैरव्यवहाराचे नव्हे, तर गुन्हेगारी, छेडछाड, हल्ले यांचेही मूळ बनले आहेत.
या अवैध धंद्यांमुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून समाजाचे नैतिक अध:पतन होत आहे. किरकोळ वादातून जिवघेणे हल्ले, मुलींवर छेडछाड, जबरदस्ती, दमदाटी या घटना वाढत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्वाची असली तरी अशा धंद्यांचे संपूर्ण उच्चाटन होण्यासाठी सातत्यपूर्ण, कठोर आणि राजकीय हस्तक्षेपविरहित कारवायांची गरज असल्याचे चित्र स्पष्ट होते.
जिल्ह्यात कुठलाही अवैध व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही. अशा धंद्यांत गुंतलेल्या प्रत्येकावर कारवाई होणार आहे, असे स्पष्ट शब्दांत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here