उमेदवार नक्की… मात्र पक्ष कोणता ?

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- दिवाळीचा गोडवा ओसरताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दीर्घ प्रतिक्षित निवडणुका आता दारात आल्याने 2017 पासून टांगणीला लागलेल्या इच्छुकांच्या आशा अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. आता वाट पाहणार नाही या वेळी मीच उमेदवार! असा निर्धार करत अनेकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
आरक्षणाच्या फेरबदलाने गणित बिघडले तरीही प्रयत्न कायम आहे. काहींचा आरक्षणामुळे हिरमोड झाला असला तरी ‘मी नाही तर माझ्या घरातील कोणी’ या भूमिकेतून अनेकांनी पत्नी, बहिण, मेहुणी किंवा विश्वासू कार्यकर्त्यांना पुढे करून उमेदवारीसाठी आटापिटा सुरू केला आहे.

पक्ष निश्चित नसला तरी उमेदवारी मात्र अटळ! असा आत्मविश्वास बाळगून अनेक इच्छुक स्वतःच्या गट-गणात फिरताना दिसत आहेत. थोरात विरुद्ध विखे – परंपरागत लढत यावेळीही रंगणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका यावेळी विशेष चुरशीच्या होणार आहेत. या पार्श्वभूमीवर थोरात-विखे घराण्यांचा ऐतिहासिक वर्चस्ववाद पुन्हा एकदा समोरासमोर उभा ठाकणार आहे. थोरात गटाचा भर : राहाता मतदारसंघातील जोर्वे, आश्वी सह विविध गावांवर असणार आहे. तर विखे-खताळ गटासमोर विधानसभा निकालाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान असणार आहे. त्यासाठी महायुती जोरदार तयारी करताना दिसत आहे.

दोन्ही बाजूंनी उमेदवारीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली असून, ‘तिकीट मिळालेच पाहिजे’ अशी धडपड शिगेला पोहोचली आहे. ‘पक्ष ठरवू नंतर’ – दोन्ही दगडांवर पाय ठेवून काही इच्छुकांनी अजूनही अंतिम निर्णय राखून ठेवला असून, प्रचार सुरू आहे पक्षांतर नंतर सांगू! असे सांगून मतदारांना भेटत आहे. दिवाळी संपली तरी अजूनही शुभेच्छांच्या नावाखाली मतदारांशी गाठीभेटी वाढवत आहेत. राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत असल्याने कोण कुठे उभे राहणार, कोण कधी पलटी मारेन याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वत्र तोंडात गोड आणि मनात आकांक्षा अशा वातावरणात तालुक्याची निवडणूक रंगून जाणार यात शंका नाही.






















