मयत सुरजच्या कुटूंबीय व नागरीकांच्या दबावानंतर अखेर गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहराजवळील संगमनेर खुर्द येथील सुरज सूर्यभान शिंदे (वय – 36) या युवकाचा गुरुवारी रात्री झालेला संशयास्पद मृत्यू हा अपघात की घातपात हा प्रश्न मागील 48 तास उलटून गेल्यानंतरही अनुत्तरित आहे. गुरुवारी रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास स्कुटीची धडक लागून एक व्यक्ती जखमी झाल्यानंतर सुरजला बेदम मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप समाज बांधवांनी केला आहे. या मारहाणीतच सुरजचा मृत्यू झाल्याचा दावा करत न्यायासाठी मयताचे कुटूंबीय व समाज आता रस्त्यावर उतरला होता. जोपर्यंत सुरजला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेत मागील 38 तासांपासून समाज बांधव आणि कुटुंबियांनी मृतदेहासह शहर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला होता.

कुटूंबीयांनी व नातेवाईक, नागरीकांनी एक प्रकारे पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. अखेर श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संगमनेरात धाव घेत कुटूंबीयांशी चर्चा केली. व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर हा तणाव काहीसा निवळला. त्यानंतर संध्याकाळी मयत सुरजवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
नाशिकयेथून शवविच्छेदनानंतर शुक्रवारी सायंकाळी सुरजचा मृतदेह संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने समाजबांधव रात्रभर तिथेच ठिय्या देत न्यायाच्या प्रतीक्षेत उभे राहिले. एकीकडे तपासासाठी तीन दिवसाची मुदत मागत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच रीतसर गुन्हा दाखल करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असलेले पोलीस निरीक्षक समीर बारवकर, तर दुसरीकडे समाज न्यायाच्या भूमिकेवर ठाम, हेच या घटनेचे विदारक वास्तव ठरले. जोपर्यंत गुन्हा दाखल करून आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत हा उद्रेक थांबणार नाही, असा थेट इशारा कुटुंब व समाज बांधवांनी दिला होता.

प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास पुणे – नाशिक महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसमोर सुरजचा मृतदेह ठेवून रास्ता रोको करण्याचा निर्धार समाजाने जाहीर केला होता. नाशिक, अकोले, श्रीरामपूर, पारनेर, कोपरगावसह अनेक गावांमधून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले होते. पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाली नाही किंवा न्याय मिळाला नाही, तर संगमनेरमध्ये तात्काळ रास्ता रोको करू तसेच न्याय मिळेपर्यंत हटणार नाही असा एकसंध निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी एकप्रकारे पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.
त्यामुळे श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी देखील संगमनेरात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला.

आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. निलम खताळ, त्याचबरोबर नातेवाईक, समाजातील काही मान्यवर यांच्या सोबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात बैठक घेतली. सुरूवातीला शवविच्छेदन अहवालाची वाट पाहू असे सांगितले मात्र कुटूंबीय आमच्याकडे पुरावे असल्याचे सांगत आपल्या मागणीवर कायम राहिले. त्यामुळे अखेर पोलीसांना नमते घ्यावे लागले आणि दुपारनंतर त्यांनी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
या सर्व प्रक्रियेदरम्यान शहर पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. परिसरातील वाहतूक देखील ठप्प झाली होती. पोलीस ठाण्याचे दोन्ही गेट बंद करण्यात आल्याने एक प्रकारे मोठा संघर्ष निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात होती.





















