
संतप्त नागरीकांचे संगमनेर खुर्द कचरा डेपो ला ‘टाळे ठोको’ आंदोलन
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर खुर्द येथील नगरपालिकेच्या कंपोस्ट कचरा डेपोमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी कचरा डेपोला टाळे ठोकले. प्रशासनाने लेखी स्वरूपात कचरा डेपो अन्यत्र हलविण्याचे आणि इतर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.
संगमनेर शहरातील ओला व सुक्या कचर्याच्या विल्हेवाटीसाठी संगमनेर नगरपालिकेने सुमारे 50 वर्षांपूर्वी हा डेपो सुरू केला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून या डेपोमुळे परिसरातील पिण्याचे पाणी प्रदूषित झाले असून, अनेकांना श्वसन व त्वचेचे त्रास होऊ लागले आहेत. परिणामी, ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी याआधीही अनेकवेळा आंदोलन करून कचरा डेपो दुसरीकडे हलविण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही वर्षांपूर्वी पालिकेने कुरण परिसरात 12 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, त्या ठिकाणी कचरा डेपो सुरु करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नव्हत्या.

गेल्या काही दिवसांपासून कंपोस्ट डेपोमधून दुर्गंधी आणि साचलेल्या कचर्यामुळे पाणी अधिकाधिक दूषित होत असल्याने ग्रामस्थांनी यावेळी तीव्र भूमिका घेत, कचरा डेपोला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी संगमनेर खुर्दमधील ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी डेपोला टाळे ठोकले. लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला होता. आंदोलनाची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे कर्मचार्यांसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. चर्चेनंतर ग्रामस्थांना लेखी आश्वासन देण्यात आले की, संगमनेर खुर्द येथील कंपोस्ट डेपोच्या जागेवर संरक्षक भिंत बांधण्याचे प्रस्तावित असून, निधी मिळाल्यानंतर लगेचच निविदा प्रक्रिया राबवली जाईल. संरक्षक भिंत पूर्ण झाल्यानंतर संगमनेर नगरपरिषद मालकीच्या कुरण रोड येथील 12 एकर जागेत संपूर्ण मशिनरीसह डेपो हलवण्याची कार्यवाही होईल. ही प्रक्रिया येत्या तीन ते चार महिन्यांत पूर्ण केली जाईल.
या आंदोलनात संगमनेर खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाऊसाहेब गुंजाळ, माजी उपसरपंच गुलाब शेख, महेश सातपुते, पावबाके, रामराव गुंजाळ, जोरवेकर आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
