
आ अमोल खताळ यांनी विधानसभेत लक्षवेधी माडत केली मागणी
संगमनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांकडे आमदार अमोल खताळ यांनी शासनाचे लक्ष वेधले. शहरातील पोलिसांसाठी निवासी सुविधा, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरील तयारी, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प, धोकादायक पूल आणि रखडलेली सार्वजनिक बांधकामे यासारख्या मुद्द्यांची त्यांनी विधानसभेत ठळकपणे मांडणी केली.
पोलिसांसाठी निवासी सुविधा आवश्यक-
संगमनेर शहरात कार्यरत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना आजही निवासी सुविधांचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी यापूर्वीच यासाठी प्रस्ताव दिला असून, आता शासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पोलिस दलाच्या सुरक्षिततेसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही सोय अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेरची पूर्वतयारी आवश्यक-
नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून संगमनेर शहराची पूर्वतयारी आवश्यक असल्याचे खताळ यांनी अधोरेखित केले. कुंभमेळ्यात स्नानासाठी साधू-संत प्रवरा नदीच्या घाटांवर येत असल्यामुळे संगमनेरमधील अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण आणि विकास कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी त्यांची सूचना होती.
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग लवकर व्हावा-
संगमनेर शहरातून जाणारा नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. हा महत्त्वाचा दळणवळण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी शासनाने तातडीने प्रयत्न सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे-
संगमनेर खुर्द व संगमनेर बुद्रुकला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल अजूनही वापरात असून त्याची अवस्था चिंताजनक आहे. या पुलाचे त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी खताळ यांनी केली. यासोबतच संगमनेर तालुक्यातील आणि राज्यभरातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्या पुनर्बांधणीसाठी वेळापत्रक ठरवावे, असा ठोस आग्रह त्यांनी धरला.
रखडलेल्या सार्वजनिक कामांवर ठेकेदारांना लगाम-
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अनेक प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण होत नाही. शासनाचा निधी उपलब्ध असूनही ठेकेदारांकडून होत असलेली दिरंगाई ही निषेधार्ह असल्याचे खताळ यांनी सांगितले. वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत मांडली.
संगमनेरमधील अनेक प्रलंबित व अत्यावश्यक प्रश्नांना घेऊन आ. अमोल खताळ यांनी विधीमंडळात घेतलेला पुढाकार जनतेच्या अपेक्षांना दिशा देणारा आहे. या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी आता संगमनेरकर करत आहेत. प्रश्न उपस्थित करण्यात आणि आवाज उठवण्यात आ. खताळ यशस्वी ठरले असले, तरी त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.