पोलिसांची मध्यरात्री कारवाई; १.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर प्रतिनिधी
राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा सक्तपणे लागू असतानाही संगमनेर शहरात या कायद्याला हरताळ फासणार्या घटना समोर येत आहेत. नुकत्याच घडलेल्या प्रकरणात शहर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत कत्तलीसाठी अन्न-पाण्याविना बांधून ठेवलेल्या गाई-वासरांची सुटका केली असून, या कारवाईत एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सोपान भास्कर यांच्या खरेदीवरून अज्ञात इसमाविरोधात सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासादरम्यान शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास कमल पेट्रोल पंपाच्या मागील भागात पोलिसांनी छापा टाकून, कत्तलीसाठी अनैतिक पद्धतीने अन्न व पाण्याविना बांधून ठेवलेली दोन काळ्या पांढर्या गाई आणि एक वासरू यांची सुटका केली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल उंडे यांच्या फिर्यादीवरून फारुख सय्यद (रा. जमजम कॉलनी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान एकूण पाच गाई आणि नऊ वासरे असा एकूण 1,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व जनावरे वेल्हाळे येथील पांजरपोळ संस्थेत हलवण्यात आली आहेत.
ही कारवाई केवळ जनावरांची सुटका करण्यापुरती मर्यादित नसून, शहरात सुरु असलेल्या अवैध गोवंश तस्करीच्या टोळ्यांना चपराक देणारी आहे. तरीदेखील, अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत असल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याआधी देखील संगमनेरसह राज्यातील विविध भागांमध्ये पोलिसांनी कारवाई करत हजारो किलो गोमांस जप्त केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. अनेक गुन्हे दाखलही करण्यात आले; मात्र गुन्ह्यांच्या पुढील तपास व आरोपींना शिक्षा याबाबत पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते.

गोवंश हत्या बंदी कायदा लागू असूनही या कायद्याची खुलेआम पायमल्ली केली जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संगमनेरसारख्या ठिकाणी अशा अवैध धंद्यांना पोलिस व प्रशासनाचा थेट पाठिंबा नसला, तरी दुर्लक्ष वा हलगर्जीपणामुळे या प्रकरणांना पोषक वातावरण मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शहर पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद असली, तरी अशा गुन्ह्यांचे संपूर्ण उच्चस्तरीय तपास करून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
