कायद्याने असली बंदी तरी व्यवहारात मात्र चांदीच चांदी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – एकेकाळी सुसंस्कृत, व्यापारी आणि सहकार क्षेत्रातील आघाडीचा म्हणून लौकिक मिळवलेल्या संगमनेर शहर व तालुक्याची प्रतिमा सध्या मलिन होत आहे. मटका, गुटखा, गोमांस, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि नशेच्या इंजेक्शनचा अवैध व्यापार शहरासह ग्रामीण भागात बेधडकपणे फोफावत असून कायद्याच्या अंमलबजावणीत ढिलाई व राजकीय हस्तक्षेपामुळे या अवैध कारभारात गुंतलेल्या टोळ्यांची चांदीच चांदी झाल्याची गंभीर स्थिती समोर आली आहे.
कायद्याने संपूर्णपणे बंदी असलेले हे व्यवसाय खुलेआम सुरू राहण्यामागे पोलीसांचा धाक संपल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. परिणामी अवैध मार्गाने पैसे कमावण्याचा मोह वाढत असून याचा सर्वाधिक फटका तरुण पिढीला बसत आहे. नशेच्या इंजेक्शनच्या जाळ्यात अडकून अनेक युवक आरोग्य, शिक्षण आणि भविष्य गमावत आहेत. त्यामुळे पालकवर्ग अस्वस्थ, हतबल झालेला दिसत आहे.
एका जिम सप्लिमेंट दुकानातून नशा आणि शक्तीवर्धक इंजेक्शन (मेफेनटर्माइन सल्फेट) डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस छाप्यात समोर आला. राजकीय दबाव झुगारून गुन्हा दाखल करत पोलिसांनी एकाला अटक केली. आदित्य किशोर गुप्ता असे अटक केलेल्याचे नाव आहे. आदित्य गुप्ता यास न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तो विकत असलेली औषधे नशेसाठी वापरली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुप्ता याचे शहरातील लालबहादूर शास्त्री चौकातील ’एम. आर. व्हिटॅमिन सप्लिमेन्ट शॉप’ नावाने दुकान आहे. या दुकानातून नशेसाठी वापरले जाणारे औषध अवैधरित्या विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शहर पोलिस पथकाने सोमवारी नशेची औषधे घेण्याकरिता बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. गुप्ता याने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ’त्या’ ग्राहकाला ’ते’ औषध दिले. लागलीच दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने छापा टाकत आदित्य किशोर गुप्ता यास ताब्यात घेतले. दुकानाच्या झडतीत 6 हजार 600 रुपये किमतीच्या इंजेक्शनच्या 3 बाटल्या आणि 9 इंजेक्शन सिरींज, मोबाईल व मोटारसायकलसह 2 लाख 23 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. केलेल्या कारवाईत ओतूरहून संगमनेर शहरात पुरवठा होत असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली आहे.
गुत्तेगिरी, सावकारी, मांसविक्रीतील बेकायदेशीर व्यवहार तसेच अन्नातील भेसळ यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्याला थेट धोका निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत तालुक्याची घसरगुंडी सुरू असताना अधिकार्यांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कायद्याने मटका बंद असला तरी शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी मटका खुलेआम सुरू आहे. आणि याला कुणाचे पाठबळ आहे हे सुज्ञ जनतेला कळते. केवळ कागदावरच गुटखा बंदी झाली मात्र आज पान टपर्याच काय किराणा दुकान, चहाची टपरी, जनरल स्टोअर्स मध्ये गुटखा खुलेआम विक्री सुरू आहे. हिच परिस्थिती कत्तलखाने आणि गोमांस विक्रीची आहे. अनेक वेळा गुटखा आणि गोमांस तस्करी करणार्यांवर कारवाई झाली, कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला, गुन्हे दाखल झाले तरी देखील हे धंदे थांबत नसतील तर यामागचे गौडबंगाल काय आहे न समजणारी जनता दुधखूळी नक्कीच नाही.
कत्तलखान्यावर छापा, गोमांस जप्त –
बेकायदेशीर कत्तलखान्याविरुद्ध पोलिस उपा अधिक्षकांच्या पथकाने मंगळवारी (दि.28) रोजी पहाटे छापा टाकला. शहरातील मदिना नगर येथे केलेल्या कारवाईत 3 लाख रुपयांचे तब्बल 1500 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, पोलिसांच्या हातावर तुरी देत, सलिम साटम कुरेशी व गुलाम फरीद साबीर कुरेशी हे दोघे संशयित पसार झाले. पोलिस उपाधिक्षक सोनवणे यांनी पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल कडलग, पोलिस नाईक पांडुरंग पटेकर व पोलिस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांना कारवाईचे करण्याचे आदेश दिले होते.
झोपलेले अन्न व औषध प्रशासन भेसळ पकडताना किंवा कारवाई करताना दिसत नाहीत. याचा अर्थ सर्व आलबेल आहे असे नाही. गेल्या काही दिवसांपासून तर तरुणांमध्ये इंजेक्शनद्वारे किंवा ड्रग्स, पेट्रोल, गांजा, हुक्का पार्लर च्या नशेची मोठी घातक फॅशन आली आहे. हा प्रकार थेट मृत्यूशी आणि कुटुंब उध्वस्त होण्याशी संबंधित असताना देखील याकडे केवळ आर्थिक फायद्यासाठी डोळेझाक करणारी संबंधित यंत्रणा किती सडलेली आहे याचा विचार न केलेलाच बरा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संगमनेर तालुक्याची वाढती बदनामी, बिघडणारी सामाजिक परिस्थिती आणि गुन्हेगारीला मिळणारे संरक्षण या सर्व प्रकारांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.
राजकीय दबावातून अवैध धंद्यांना चालना –
शांत, सुसंस्कृत आणि वैभवशाली असलेल्या संगमनेर शहरात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून अवैध धंदे वाढले आहेत. दादागिरी, दहशतीसह अमली पदार्थांची होणारी तस्करी हा नागरिकांमध्ये भीतीचा विषय झाला आहे. ड्रग्स हा विषय अत्यंत अवघड आहे. संगमनेरमध्ये या विषाने प्रवेश केला असून ही अत्यंत चिंतेची बाब आहे. तरुण पिढी हे आपले भविष्य आहे त्यांच्या हाती काम देण्याऐवजी जातीयवाद वाढवून राजकारण केले जात आहे हे चुकीचे आहे. इतक्या खुल्या पद्धतीने अमली पदार्थ ग्रामीण भागातही मिळतात यामागे सत्ताधारी राजकीय लोकांचे पाठबळ असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-बाळासाहेब थोरात, माजी महसूल मंत्री





















