संगमनेरात मानाच्या गणपतीच्या आरतीवरून नाराजी नाट्य

0
201

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव संगमनेरात दहा दिवस मोठ्या आनंदाने आणि भक्तीभावाने साजरा झाला. मात्र शनिवारी विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पहिल्या गणपतीच्या आरती वरून आजी आमदारांनी काहिसी नाराजी व्यक्त करत तेथून निघून गेल्याने या नाराजी नाट्याची शहरात मोठी चर्चा झाली. किमान देवाच्या दरबारी अशा नाट्यमय घटना घडू नये अशी भावना गणेश भक्तांनी व्यक्त केली.
दरम्यान या नाराजी नाट्यानंतर सोमेश्‍वर मित्र मंडळ रंगारगल्लीचे जेष्ठ मार्गदर्शक कृष्णराव उर्फ आप्पासाहेब सुंदरराव खरे यांनी या घटनेचा उलगडा करत या मानाच्या गणपतीची आरतीचा पहिला मान हा विद्यमान आमदारांना असतो हा काही नियम नाही तर तो मंडळाचा अधिकार आहे. तसेच मंडळाच्या वतीने देण्यात येणारे मानपत्र हे आमदारांना नाही तर या उत्सवात ज्या मंडळाने चांगले काम केले त्या मंडळांना पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येते. मात्र विद्यमान आमदार अमोल खताळ यांनी या मानपत्राचे वाटप न करता ते भिरकावून दिले हा मंडळाचा एकप्रकारे अवमान आहे. या ठिकाणी झालेला प्रकार हा गैरसमजातून झाला असून यापुढे देखील मानाच्या आरतीसाठी कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही बोलवायचे याचा निर्णय देखील हे मंडळ घेईल अशी माहिती आप्पासाहेब खरे यांनी दिली.
याबाबत अधिक बोलताना खरे म्हणाले की, संगमनेर शहरातील रंगार गल्ली येथील सोमेश्‍वर मित्र मंडळाच्या मानाच्या गणपतीची 130 वर्षाची परंपरा आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात 2001 साली मंडळाच्या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक ही सकाळी आठ वाजता काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तेंव्हापासून ही परंपरा अद्यापपर्यंत चालू आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत आरतीचा मान हा आमदारांना नसतो तर ते मंडळ ठरवत असते. यावर्षी मंडळांने माजी आमदार बाळासाहेब थोरात व विद्यमान आमदार अमोल खताळ यांना बोलावून आरतीचे दोन ताट करून त्यांना आरतीचा मान दिला. तसेच या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र याठिकाणी गैरसमजातून वेगळीच घटना घडली. दरम्यान मानपत्र हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व विद्यमान आमदार अमोल खताळ यांना देण्यात आलेली नव्हते तर दरवर्षी शिल्पकार कै. सुंदरराव गोविंदराव मिस्त्री खरे कला प्रतिष्ठान यांच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध मंडळ व विविध क्षेत्रातील मान्यवरांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुरस्कार म्हणून मानपत्र देण्यात येते. यावर्षी देखील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हिंदू राजा प्रतिष्ठान ढोल ताशा पथक यांना तर आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते देवी गल्ली गणेशोत्सव मित्र मंडळ यांना मानपत्र देऊन गौरवण्यात येणार होते. शांततेत व भक्तीमय वातावरणात आरती झाल्यानंतर दोन्ही मंडळांना पुरस्कार देण्यासाठी एक मानपत्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात व दुसरे मानपत्र आमदार अमोल खताळ यांच्या हातात देण्यात आले मात्र आमदार अमोल खताळ यांनी मानपत्र परत केले आणि निघून गेले. त्यामुळे काल झालेल्या प्रकार हा गैरसमजुतीतून झाला असल्याचे खरे यांनी सांगितले.

राजकारण दुर्देवी – आ. खताळ
मानाचा पहिला गणपती असलेल्या सोमेश्‍वर मित्र मंडळाच्यावतीने विद्यमान आमदारांना पहिला मान दिला जातो. या मित्रमंडळाने आमदार अमोल खताळ यांच्याबरोबरच ज्येष्ठ नेते म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही उत्सवाचा मान दिला. घडलेल्या प्रकारानंतर खताळ म्हणाले की, आपण आमदार म्हणून नाही तर प्रेमापोटी गणेश भक्त म्हणून या ठिकाणी आलो असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. दुर्दैवाने या ठिकाणी राजकारण झाले त्यामुळे मन व्यथित झाले. आमदार खताळ यांना आरतीचा मान देण्यात आला तरी त्यांनी मानपत्र स्वीकारले नाही. याबाबत आपण नाराज नसल्याचे सांगत आ. खताळ यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आमदार नसतानाही आपण गणेश भक्त म्हणून दिवसभर विविध मंडळात सेवा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात हे आमचे पूर्वीचे मित्र होते नंतर ते आमदार झाले. 2001 पासून त्यांना आम्ही सकाळी विसर्जन मिरवणुकीला बोलवतो. त्यावेळेला सर्व शासकीय अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतात. माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते 2011 पासून हे पुरस्कार देत आलेले आहे. गेल्या वर्षापर्यंत 28 पुरस्कार थोरात यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मंडळांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल ती मानपत्र दिलेली आहेत. परंतु आ. खताळ यांनी एका कार्यकर्त्याच्या हातात ते फेकून देत माझा अपमान झाला म्हणून ते तेथून निघून गेले. खरंतर या मंडळामध्ये विसर्जन मिरवणूकीसाठी कोणाला बोलवायचं हा पूर्णपणे मंडळाचा निर्णय आहे ती प्रशासकीय नियम नाही. या कृतीमुळे आमच्या या मानाच्या गणपतीचा सुद्धा अपमान केला असं माझं वैयक्तिक मत आहे असे देखील खरे यांनी म्हटले आहे. या प्रकाराची दोन्ही बाजूंनी सोशल माध्यमातून जोरदार चर्चा झाली. मात्र आप्पासाहेब खरे यांनी या बाबत अधिकृत भाष्य केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडतो की हे राजकीय मानापमान नाट्य अधिक रंगते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here