आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून निधी मंजूर!

धार्मिक विधींसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर शहराचा सर्वांगीण विकास गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. शहराने आज स्वच्छता, नियोजन आणि आधुनिकतेच्या बाबतीत आदर्श स्थान मिळवले आहे. नगरपरिषदेला मिळालेली विविध पारितोषिके हे या यशाचे उत्तम उदाहरण आहे. नागरिकांच्या वाढत्या वर्दळीचा आणि त्यांच्या सोयींचा विचार करून आमदार सत्यजीत तांबे यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये संगमनेर शहरातील ई-टॉयलेट्ससाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला.
आज आमदार तांबे यांनी प्रवरानदीवरील केशवतीर्थ घाट परिसरात ई-टॉयलेट्स व चेंजिंग रूम उभारण्यासाठी दोन ठिकाणांची पाहणी केली. व संगमनेर नगरपरिषदेचे अभियंता पंकज मुंगसे यांना बोलावून माझ्या निधीतून ई-टॉयलेट्समधून केशवतीर्थ परिसरात महिला आणि पुरुषांसाठी तातडीने दोन स्वतंत्र ई-टॉयलेट्स आणि चेंजिग रूम उभारावी अशा सुचना दिल्या.

याचबरोबर आमदार सत्यजीत तांबे यांनी शहरातील तरुणांसाठी खेळ आणि क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी जोर्वे नाका परिसरात भव्य क्रीडांगण उभारण्यासाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या माध्यमातून संगमनेरच्या तरुणाईला दर्जेदार सुविधा मिळणार असून, त्यांच्या प्रतिभेला नवी दिशा मिळेल.
या ई-टॉयलेट्समध्ये स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान, टचलेस ऑपरेशन सिस्टीम, सोलर लाइटिंग आणि वॉटर रिसायकलिंग युनिट अशा आधुनिक सुविधा असणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे ई-टॉयलेट्स स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार आहेत. प्रवरानदीवरील केशवतीर्थ घाटावर ई-टॉयलेट्स उभारल्याने नागरिकांना मोठी सुविधा मिळणार असून, घाट परिसर स्वच्छ, आकर्षक आणि पर्यावरणपूरक ठेवण्यास मदत होणार आहे.
संगमनेर शहरातील केशवतीर्थ हे धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून येथे वारंवार दहाव्याच्या विधीच्या वेळी महिलांना व पुरुषांना कपडे बदलण्यासाठी योग्य सुविधा नसतात. या अडचणीचा विचार करून आमदार सत्यजीत तांबे यांनी केशवतीर्थ येथे स्वतंत्र महिला आणि पुरुषांसाठी चेंजिंग रूम व ई-टॉयलेट्स साठी निधी मंजूर करुन आणला. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून घाट परिसर स्वच्छतेच्या आणि सोयीच्या दृष्टीने अधिक सुसज्ज होणार आहे.






















