रोजचा लुटमारचा खेळ, पोलिसांच्या निष्क्रियतेचा जनतेला त्रास !

संगमनेर (प्रतिनिधी):
संगमनेर शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांनी शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. महिलांपासून व्यावसायिकांपर्यंत आणि प्रवाशांपासून दुकानदारांपर्यंत, सर्वसामान्य नागरिक आज असुरक्षिततेच्या छायेखाली जगत आहेत. पोलिस प्रशासन मात्र या सर्व गंभीर घटनांकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र समोर येत आहे.
शहरात पायी जाणार्या महिलांच्या गळ्यातून सौभाग्याचे लेणे आणि सोन्याचे दागिने दिवसाढवळ्या ओरबाडून नेले जात आहेत. दुसरीकडे व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये भरदिवसा शस्त्रांचा धाक दाखवत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक लुटमार करत आहेत. याचवेळी शहराच्या बसस्थानकात रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या खिशातून रोकड, मोबाईल आणि दागिने लुटले जात असून विरोध केल्यास प्रवाशांना मारहाण केली जाते.

हॉटेलमध्ये घुसून चोपरचा धाक दाखवत लूट
गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास संगमनेर शहरालगतच्या राहणे मळा येथील ’हॉटेल सूरज’ मध्ये धीरज राजेंद्र पावडे, अक्षय रामा भुजबळ आणि शुभम दिवे (सर्व रा. श्रीरामनगर, संगमनेर) या तिघांनी जबरदस्तीने घुसून चोपरचा धाक दाखवत हॉटेलमधील काउंटरवरून तब्बल 11,500 रुपये रोख रक्कम लुटली. या प्रकरणी हरीश दिलीप थोरात (रा. इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 512/2024 अन्वये इछड कलम 3094 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्यापही आरोपी मोकाट फिरत असून त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
बसस्थानक म्हणजे लुटीचे केंद्र!
संगमनेर बसस्थानक हे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी झोपलेल्या प्रवाशांवर दारूडे व नशेत असलेले गुन्हेगारी वृत्तीचे तरुण हल्ला करत आहेत. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व दागिने लुटले जातात. काल रात्रीदेखील अशीच एक लुटमार झाली असून, पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी केवळ टवाळखोरांना हुसकावण्यापुरतेच समाधान मानले. गंभीर गुन्हा असूनही कुठलीही कारवाई न करता, ‘दारूडे आहेत’ म्हणून त्यांना मोकळे सोडले गेले.

पोलिसांच्या निष्क्रीयतेवर प्रश्नचिन्ह
या सर्व घटनांमध्ये एक गोष्टठिंळून दिसते – पोलीस प्रशासनाची निष्क्रियता. गुन्हा दाखल करताना टाळाटाळ, गंभीर प्रकरणांमध्ये हलक्या पद्धतीची नोंद, आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई न करणे – या सगळ्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढत आहे आणि सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, अनेक घटनांमध्ये त्याच व्यक्तींची नावे पुन्हा पुन्हा समोर येत असूनही पोलिसांनी अद्याप कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही.
‘कायदा’ आहे कुणासाठी?
अशा परिस्थितीत सामान्य नागरिक ‘सुरक्षिततेसाठी कुणाकडे जावे?’ असा प्रश्न विचारत आहेत. गुन्हेगारांची छाती फुगते आहे आणि पीडित नागरिकांची पाठ झुकते आहे. तक्रार केल्यास चौकशीत मानसिक त्रास दिला जातो, उलटसुलट प्रश्न विचारले जातात. परिणामी, नागरिक गुन्हा सहन करून गप्प बसण्याची मानसिकता ठेवू लागले आहेत.

जनतेची मागणी – कठोर कारवाई आणि जबाबदार पोलीस यंत्रणा!
सध्या शहरात जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालून गुन्हेगारांवर कठोर कारवाई, पोलीस यंत्रणेमध्ये शिस्त आणि उत्तरदायित्व, आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा हे प्राधान्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.