शहरातील अस्वच्छता विरोधात नागरिकांचा नगरपालिकेत मोर्चा

0
31

संगमनेर शहराची ओळख स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर अशी करून दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी खराब रस्ते, अस्तव्यस्त कचरा, मोकाट जनावरे, डुक्कर व भटके कुत्रे या समस्या मोठ्या प्रमाणावर सतावत असतात. बसस्थानक परिसरात रात्रीच्यावेळी भिकार्‍यांसह मोकाट जनावरांचा मुक्काम असतो. त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणात केलेली घाण हा गेल्या काही दिवसांपासून कळीचा मुद्दा बनला आहे. तर रस्ते आणि उपनगरात मोकाट जनावरांची भटकंती प्रचंड त्रासदायक ठरत आहे. याबाबत नगरापीलीकेला कळविल्यास पालीका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद किंवा कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप छायाचित्रकार प्रसाद शिरसाठ (सुतार) यांच्यासह अनेक नागरीकांनी केला आहे. वरील छायाचित्र देखील पुरावा म्हणून त्यांनी दिले आहेत.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सततच्या विकास कामांतून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात नगरपालिकेने स्वच्छ शहर, सुंदर शहर ही संकल्पना राबवत राज्य व देश पातळीवर स्वच्छतेचे विविध पारितोषिक मिळवली. संपूर्ण शहर हिरवे आणि स्वच्छ ठेवले. मात्र मागील तीन वर्षापासून प्रशासनाच्या कारभारामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली असून या विरोधात नागरिकांनी नगर परिषदेवर एल्गार मोर्चा काढला.
माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील सर्व प्रभागातील नागरिकांनी शहरातील वाढत्या अस्वच्छतेबाबत प्रशासनाला धारेवर धरले यावेळी मा. नगराध्यक्ष विश्‍वासराव मुर्तडक, शहराध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे, नितीन अभंग,गणेश मागास, सौ. प्रमिला अभंग, अ‍ॅड. प्रमोद कडलग, निखिल पापडेजा, मुस्ताक शेख, वैष्णव मुर्तडक, मनोज यंगदाल, राजेंद्र वाकचौरे, मिलिंद औटी, सुरेश झावरे, लक्ष्मण बर्गे, सुविधा आरसिद्ध, अनिता साळवे, अंबादास आडेप, योगेश जाजू, सुभाष दिघे, स्वप्निल गुंजाळ, मिश्रा भाबी, सचिन खाडे, किशोर बोराडे, प्रमोद गणोरे, सचिन वामन, नूर मोहम्मद खान, डॉ. दानिश पठाण, गजेंद्र अभंग आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहरांमध्ये गाई, कुत्री, डुकरे मोकाट फिरत असून त्यामुळे अपघात व स्वच्छता वाढली आहे. कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन होत नाही. शहरात अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहे. ते वेळेवर उचलले जात नाही. घंटागाडी वेळेवर येत नाही. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. डेंगू, मलेरिया सारखे आजारांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र याबाबत प्रशासन उदासीन आहे. यावेळी बोलताना सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर नगर परिषदेला मागील दहा वर्षांमध्ये स्वच्छता व चांगल्या कामामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुमारे दहा कोटींची विविध पारितोषिके मिळाली आहे. यातून शहरातील रस्ते गार्डन विकास कामे करता आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासाच्या योजना राबवल्या. याचबरोबर कुंभमेळा योजनेतून त्यांनी म्हाळुंगी नदीच्या बाजूने रिंग रोड तयार करून घेतला. स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवली यामध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग राहिला.

ओला कचरा व सुक्या कचर्‍याचे चांगले व्यवस्थापन झाले. मात्र मागील तीन वर्षांपासून नगरपालिकेत प्रशासन असून राज्यातील सत्ताधार्‍यांच्या मर्जीनुसार ते काम करत आहे. शहरांमध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कचरा डेपो चा डोंगर झाला आहे.ठिकठिकाणी कचरा साठला आहे. म्हाळुंगी नदीच्या काठावर अस्वच्छतेचा कहर झाला आहे. प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही. स्वच्छतेच्या बाबतची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने संपूर्ण स्वच्छतेकडे लक्ष द्यावे कारण. या अस्वच्छतेमुळे डेंगू मलेरिया यांचं सह विविध साथींचा आजाराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर उंदीर,घुशी, मच्छर हे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने स्वच्छतेचे उपाय करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी विविध महिलांनी अस्वच्छतेबाबत प्रशासना विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाहेरगावी असल्याने दूरध्वनी द्वारे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ही निवेदन डेपोटी मुख्याधिकारी संजय टेकळे,प्रशांत जुन्नरे, राजेंद्र गुंजाळ अमजद भाई यांनी स्वीकारले.

महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्रातील वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाचे सदस्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे संगमनेर शहरातील आहे. नगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या बाबत ज्यांना निमंत्रित करणे, सुचित करणे हे नगरपालिकेचे परम कर्तव्य आहे. मात्र राजकीय दबावातून जर नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक त्यांना जर टाळत असेल तर हा राज्यघटनेचा आणि राजशिष्टाचाराचा पूर्णपणे अपमान असून स्वाभिमानी संगमनेरकर हे कधीही सहन करणार नाही. आणि पुन्हा असे घडल्यास संगमनेर शहरातील सर्व नागरिक नगरपरिषदेला टाळे ठोकतील असा निर्वाणीचा इशारा माजी शहराध्यक्ष विश्‍वासराव मुर्तडक यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here