घंटागाडी ठेकेदाराला एकदा समज द्या. सुधारत नसेल तर त्याचा ठेका रद्द करा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील सफाई कामगारांच्या विविध मागण्या आठ दिवसांत पूर्ण करा, अन्यथा सद्यःस्थितीत कार्यरत असणार्या घंटागाडी ठेकेदाराला एकदा समज द्या. जर तो सुधारत नसेल तर त्याचा ठेका रद्द करा आणि नवीन टेंडर काढून नवीन ठेकेदार नेमावा, अशा सूचना आ. अमोल खताळ यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिल्या आहे.
संगमनेर नगरपरिषदेतील सर्व सफाई कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. कामगारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नगरपालिका प्रशासनात खळबळ उडाली होती. मुख्याधिकारी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ठाम राहिले. ही बाब आ. खताळ यांना समजताच त्यांनी तात्काळ शिवसेना पदाधिकार्यांना नगरपालिकेमध्ये पाठवून कामगारांच्या मागण्या जाणून घेण्याच्या सूचना दिल्या.

ज्यातील महायुती सरकार हे सर्व सामान्यांचे सरकार आहे. नगरविकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे शासन स्तरावरील तुमच्या मागण्यांसाठी मी प्रयत्न करेन. शहराची स्वच्छता राखणे ही तुमची सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून यापुढे काम बंद आंदोलन करू नका. तुमच्या समस्या असल्यास त्या मुख्याधिकार्यांना सांगा. त्यांनी ऐकले नाही, तर माझे संपर्क कार्यालय तुमच्यासाठी कायम खुले आहे. मी तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे.
आमदार अमोल खताळ
त्यानंतर या पदाधिकार्यांनी सफाई कर्मचार्यांशी चर्चा करून आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक आयोजित केली जाईल असे सांगून तुम्ही कामबंद आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली. त्यानुसार सर्व सफाई कामगारांनी आपले बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेतले. आ. खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी सफाई कामगारांच्या मागण्या आ. खताळ यांच्यासमोर वाचून दाखविल्या. त्यानंतर आ. खताळ यांनी मुख्याधिकारी कोकरे यांच्याशी चर्चा करत, आठ दिवसांमध्ये मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सर्व सफाई कामगारांचा जुलै महिन्याचा पगार सायंकाळपर्यंत ऑनलाईन जमा केले जाईल. तसेच महिन्यात चार पगारी सुट्टया देण्याचे आश्वासनही या बैठकीत देण्यात आले.




















