संगमनेरात चेन स्नॅचिंगचा कहर

0
154

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळ्याचे गंठण हिसकावले

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर बस स्थानक परिसरात वारंवार मंगळसूत्र चोरी, पाकीटमारी व महिलांच्या पर्स लांबविण्याच्या घटना घडत असतानाच आता शहर व उपनगरांमध्ये जबरी चोर्‍या आणि चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढले असून, गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे आता हे प्रकार केवळ गर्दीच्या ठिकाणीच नव्हे तर शांत, गजबज नसलेल्या उपनगरांमध्येही भरदिवसा घडू लागले आहेत.
अशीच एक धक्कादायक घटना संगमनेर शहरातील गणेश नगर या उपनगरात घडली असून, पायी चालणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी अक्षरशः हिसकावून तोडून पळ काढला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपनगरात भीतीचे वातावरण

चोरटे गर्दीच्या ठिकाणा ऐवजी उपनगराला आपले लक्ष बनवत आहे. पायी चालणार्‍या महिलांच्या गळ्यातून सहज दागिणे ओरबाडून पळ काढता येतो. त्यामुळेच शहरातील मालदाड रोड, नविन अकोले बायपास रोड, घुलेवाडी रोड, नाशिक रोड अशा ठिकाणी या चोर्‍या वारंवार होतांना दिसत आहे. धुम स्टाईलने चोरटे पसार होत असल्याने त्यांच्या शोध लागत नसल्याने उपनगरात महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या प्रकरणी नंदा आनंदा हासे (रा. राजापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या संगमनेर शहरातील गणेश नगर येथील आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी जात असताना, विना नंबरच्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर दोन अज्ञात इसम आले. दोघांनीही डोक्यावर काळ्या रंगाचे हेल्मेट घातलेले होते. पाठीमागून अचानक आलेल्या या चोरट्यांनी क्षणाचाही विलंब न करता फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जोरात ओढून तोडले व वेगाने घटनास्थळावरून फरार झाले.
विशेष म्हणजे ही घटना सोमवारी भरदिवसा आणि दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिलांमध्ये विशेषतः असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, उपनगरातील नागरिकांनी पोलिसांच्या गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
पोलीस दप्तरी या सोन्याच्या गंठणाची किंमत 3 लाख 67 हजार रुपये इतकी नोंदविण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक सावंत हे पुढील तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, संशयित मोटारसायकल आणि चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरम्यान, संगमनेर शहरात वाढत चाललेल्या चेन स्नॅचिंग, मंगळसूत्र चोरी आणि इतर अवैध धंद्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here