ऐन सिग्नलवर ट्रक बंद; वाहतुकीचे तीन तेरा

0
38

क्लिनर झोपेत; पोलिसांची बघ्याची भूमिका

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर नाशिक-पुणे महामार्गावर गुरुवारी सकाळी ऐन सिग्नलवर ऊस वाहतूक करणारा एक अवजड ट्रक अचानक बंद पडून उभा राहिल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली. या प्रकारामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून तब्बल तीन ते चार तास वाहतूक ठप्प झाली होती.
विशेष म्हणजे, ट्रक बंद पडताच चालक ट्रक सोडून गायब झाला, तर क्लिनर मात्र मद्यधुंद अवस्थेत ट्रकच्या केबिनमध्ये झोपलेला आढळून आला. ट्रक डिझेल संपल्याने बंद पडला की यांत्रिक बिघाडामुळे थांबला, याबाबतही कोणतीही स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.

ऐन सिग्नलजवळ महामार्गावर ट्रक आडवा उभा राहिल्याने प्रवासी वाहने, खासगी बस, रुग्णवाहिका तसेच दुचाकी चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नागरिक आणि वाहनचालक संतप्त होत असताना, वाहतूक पोलीस मात्र क्रेन लावून ट्रक बाजूला घेण्याऐवजी केवळ बाजूने वाहने काढून देत बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महामार्गासारख्या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर चार तास ट्रक उभा राहूनही यंत्रणेने कोणतीही तातडीची कारवाई न केल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अखेर उशिरा परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र तोपर्यंत नागरिकांचा संयम सुटून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here