आ. सत्यजित तांबे यांनी घेतली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची भेट

संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी)-
शहराच्या वैभवात भर घालणार्या आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या बसस्थानक परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी ठोस पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन बसस्थानक परिसरातील विविध महत्त्वाच्या समस्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
या बैठकीत संगमनेर बसस्थानकाच्या सर्वांगीण विकासावर सखोल चर्चा झाली. बसस्थानक हे केवळ प्रवाशांचे वाहतूक केंद्र नसून शहराची ओळख ठरणारे महत्त्वाचे प्रवेशद्वार असल्याने त्याचा विकास दर्जेदार व शिस्तबद्ध असावा, अशी ठाम भूमिका आमदार तांबे यांनी मांडली. मंत्री सरनाईक यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी आमदार तांबे यांनी बसस्थानक परिसरात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासाठी वाढीव जागा तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. या ऐतिहासिक स्मारकामुळे संगमनेर शहराच्या सौंदर्यात, अस्मितेत आणि गौरवात मोठी भर पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, बसस्थानक परिसरात होणारे सार्वजनिक कार्यक्रम व अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून देत, याला तात्काळ पायबंद घालण्यासाठी परिवहन विभागाने स्थानिक अधिकार्यांना कडक सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी लावून धरली.
बसस्थानकातील पार्किंग व्यवस्थेचा अभाव व वाढते अतिक्रमण हे गंभीर प्रश्न असल्याचे सांगत, विमानतळाच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या वास्तूची नियमित स्वच्छता राखणे व पार्किंग सुविधा तातडीने कार्यान्वित करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार तांबे यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
याशिवाय, सामाजिक बांधिलकी जपत अपंग लाभार्थ्यांसाठी आरक्षित असलेले गाळे अद्याप प्रलंबित असल्याने ते विनाविलंब हस्तांतरित करण्याची मागणीही त्यांनी ठामपणे मांडली.

आमदार सत्यजित तांबे यांच्या या नियोजित आणि दूरदृष्टीपूर्ण मास्टरप्लॅनमुळे संगमनेर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून, प्रवाशांना लवकरच स्वच्छ, सुरक्षित व उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. भव्य बसस्थानकात लवकरात लवकर वरिलप्रमाणे सुधारणा होवून कार्यवाही झाल्यास खर्या अर्थाने संगमनेरच्या बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलेल.





















