महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांना गती, योजनांचा मिळाला लाभ !

संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असलेली विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत एका वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी आणला असल्याची माहीती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
ग्रामीण भागातील रस्ते हा खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाचा कणा आहे, हे ओळखून आमदार खताळ यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंच्या अंतर्गत ग्रामीण रस्त्यांसाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. अनेक वर्षांपासून खराब झालेले रस्ते, पावसाळ्यात तुटणारा संपर्क आणि दुर्गम गावांचा प्रश्न आता मार्गी लागत आहे. एका वर्षाच्या कार्यकाळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामीण रस्त्यांसाठी निधी आणणारे आमदार अमोल खताळ हे संगमनेर मतदार संघातील एकमेव आमदार असल्याचे वास्तव अधोरेखित होत आहे.
ग्रामीण भागासोबतच शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासाकडेही त्यांनी तितकेच लक्ष दिले. शहरातील रस्ते, ड्रेनेज व दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी तुकडाबंदी कायद्यावर तसेच शहरात अतिक्रमणित जागेवरील पोकळीस्त नोंदी याबाबत विधिमंडळात आवाज उठविल्यामुळे संगमनेरच्या नागरिकांबरोबरच संपूर्ण राज्यातील गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून अनेक प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. तालुक्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी आमदार खताळ यांनी विशेष लक्ष दिले आहे. संगमनेर (घुलेवाडी) ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर तसेच स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय उभारण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन योजनेतील निकृष्ट कामांची चौकशी करण्याची ठाम मागणी आ.खताळ यांनी केली आहे. विशेष म्हणजे साकूर पठार भागात मुळा धरणाच्या बॅक वॉटरवर आधारित उपसा सिंचन योजना मंजूर करून घेण्यात यश मिळाले आहे. मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने योजनेचे सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले आहे.याशिवाय भोजापूर डावा कालवा व पूरचारी दुरुस्तीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. वक्फबोर्डाचे खोटे दावे, सहकार न्यायालयातील अडचणी, स्वस्त धान्य दुकानांतील ई-पॉस मशीनचा प्रश्न, पोलीस वसाहत, वीज उपकेंद्रे, पशु वैद्यकीय दवाखाने आदी अनेक प्रश्नांकडे आमदार खताळ यांनी विधिमंडळाच्या विविध अधिवेशनातून शासनाचे लक्ष वेधले असून ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

आ. खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेरच्या औद्योगिक प्रगतीसाठी एमआयडीसीची मंजूरी अंतिम टप्प्यात असून प्रक्रिया वेगाने सुरू आहे. नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी कवठे मलकापूर येथील जागेचा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच संगमनेर आगारातील अपुऱ्या एसटी बसेस आणि प्रवाशी वर्गाची मागणी लक्षात घेता संगमनेर आगारात परिवहन विभागाच्या वतीने नव्याने १० एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. संगमनेर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित केली. संगमनेरकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक ''गुरखा'' अग्निशमन वाहन दाखल झाले आहे. संगमनेरला महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून ४ हजार ९२७ लाभार्थ्यांना शैक्षणिक योजनांसह कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून ४ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी वितरित झाला आहे. बांधकाम आणि घरेलू कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी संगमनेरमध्येच ८ हजार ४१५ कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वाटप करण्यात आले. तसेच आ. खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे हिवरगाव पावसा येथील देवगड (खंडोबा) देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात आला. जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी ४६ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.

अवैध कत्तलखाने, अमली पदार्थ विक्री, बेकायदेशीर धंदे यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आमदार खताळ यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. या प्रकारांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच पुणे-नाशिक रेल्वे ही संगमनेर मार्गेच जावी, यासाठी आग्रही भूमिका घेत आमदार खताळ यांनी जनतेसोबत राहण्याचा निर्धार केला आहे. एकूणच अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा निधी, दर्जेदार विकासकामे आणि प्रभावी लोकप्रतिनिधित्व यामुळे आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकास साधण्यासाठी ही वाटचाल अशीच सुरू ठेवण्याचा त्यांचा ठाम संकल्प आहे. आमदार अमोल खताळ यांच्या वर्षभरातील कामगिरबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
सर्वसामान्यांचे आमदार…
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या आमदार अमोल खताळ यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या व्यथा आणि समस्या प्रत्यक्षात अनुभवल्या आहेत. नागरिक कार्यालयात त्यांची थेट भेट घेऊन अडचण मांडतात. इतर ठिकाणी आमदारांना भेटण्यासाठी पीएला फोन, पुढाऱ्यांची शिफारस अशी कसरत करावी लागते; मात्र आमदार खताळ यांच्याकडे अशी कोणतीही अडचण नाही. कमी कालावधीत जास्तीत-जास्त कामे मार्गी लावणारे आमदार म्हणून त्यांनी जनतेमध्ये एक वेगळी आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात वर्षभरात प्राप्त निधी:
- •मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत – २ कोटी १५ लाख
- •”स्मार्ट अंगणवाडी” एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत – १ कोटी ३३ लाख
- •मनरेगा अंतर्गत “मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना – २१ कोटी ४० लाख
- •भोजापूर डावा कालवा व पुर चारी दुरुस्ती व नूतनीकरण काम – ४४ कोटी ४६ लाख
- •महाराष्ट्र शासन कृषी विभाग योजना अंतर्गत लाभार्थ्यांना – १०१ कोटी ४१ लाख
- •तालुक्यातील ४४ हजार १७० अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत – ३१ कोटी ७१ लाख
- •उर्ध्व प्रवरा प्रकल्प निळवंडे धरण डावा आणि उजवा कालवा कामासाठी – ११० कोटी ९८ लाख
- •मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत अटल भूजल योजना व जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण – ८ कोटी ३४ लाख
- •संगमनेर शहरातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था परीक्षेत्र अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा रस्ते विकास योजना – १६ कोटी ३ लाख ४० हजार १५०
- •महावितरण सौर कृषी योजना, नवीन उपकेंद्र, वीज रोहित्र व वीज वाहिनी – १७ कोटी १७ लाख
- •आमदार स्थानिक विकास कार्यक्रम – ६ कोटी ९० लाख
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत – ४५ कोटी
- •पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत – २५ लाख
- •ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी विशेष अनुदान योजना – ३ कोटी ९० लाख
- •जिल्हा नियोजन – ४ कोटी ८५ लाख
- •जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ३०५४ अंतर्गत ग्रामीण विकास – १६ कोटी ८५ लाख
- •भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत – २ कोटी
- •वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत – १ कोटी १९ लाख
- •’क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत – १ कोटी ९ लाख
- •नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान – २ कोटी १० लाख
- •प्रादेशिक पर्यटन विकास योजना – १ कोटी ८० लाख
- •व्यायामशाळा विकास अनुदान योजना – १ कोटी ५ लाख
- •संगमनेर पंचायत समिती अंतर्गत विविध योजना लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना – २८५ कोटी ४१ लाख
- •आदिवासी विभाग अंतर्गत ठक्कर बाप्पा योजना – ४ कोटी १० लाख
- •डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड – १ कोटी ८९ लाख
- •संगमनेर शहर आणि तालुक्यात हायमास्ट बसविण्यासाठी – ६ कोटी ५४ लाख





















