अमृत उद्योग समूहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर अभिवादन

प्रेरणा दिनानिमित्त गावोगावी अभिवादन
संगमनेर तालुक्यात 12 जानेवारी हा प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात गावोगावी साजरा होतो. संगमनेर तालुक्यातील 171 गावे व 258 वाड्यावर प्रभात फेरी, स्वच्छता अभियान,आरोग्य शिबिर, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रक्तदान शिबिर, विविध क्रीडा स्पर्धा, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रिकेट स्पर्धा, कृषी प्रदर्शन यांसह सहकारी संस्थांच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करीत मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन साजरा झाला.
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी स्वातंत्र्य युद्धात उडी घेऊन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करताना आपल्या तत्त्वांची मूल्य जपत निष्ठा, शिस्त, काटकसर, नवनवीन धोरणांची प्रभावी अंमलबजावणी स्वच्छ चारित्र्य या विविध गुण – पैलूंनी कार्यकर्ते निर्माण केले. सहकार, शेती, शिक्षण, समाजकारण, पर्यावरण या विविध क्षेत्रात योगदान देणार्या स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवन कार्य सदैव प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या प्रेरणास्थळ येथे अभिवादन प्रसंगी कार्यक्रमाचे बोलत होते. यावेळी समवेत मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, पांडुरंग पाटील घुले, लक्ष्मणराव कुटे, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, बाबा ओहोळ, नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, सोलापूर येथील सतीशचंद्र देशमुख, महेश देशमुख, पंजाबच्या महिला सेवा दलाच्या प्रदेशाध्यक्ष ऋतुजा देशमुख, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, रामदास पा.वाघ, प्राचार्य केशवराव जाधव, प्रा.बाबा खरात, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, के.के थोरात,राजेंद्र चकोर,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर आपल्या तत्त्वांची जपणूक केली. सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरता सहकाराच्या माध्यमातून विविध संस्थांची उभारणी केली. सहकारी संस्थांमध्ये काटकसर, पारदर्शकता, शिस्त रुजवली. याचबरोबर राजकारण हे सत्तेसाठी नाही तर समाजाच्या विकासासाठी असते हा मंत्र सर्वांना दिला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी,सुभाषचंद्र बोस,इंदिरा गांधी ही त्यांची प्रेरणादायी व्यक्तिमत्व आयुष्याच्या उत्तरार्धात दंडकारण्य अभियान राबवून पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ त्यांनी राज्याला दिली. त्यांच्या आदर्श विचार तत्त्वावर संगमनेर तालुक्यातील सहकाराची वाटचाल सुरू असून यामुळे संगमनेरचा सहकार हा देशात अग्रगण्य ठरला असल्याचे ते म्हणाले.
तर मा. आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे सहकारातील संत होते. शेतकरी, कष्टकरी, कामगार व गोरगरीब नागरिक यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. कधीही तत्त्वाची तडजोड केली नाही. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात हे काम करत असून सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणार्या या नेतृत्वाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे ते म्हणाले.
तर सोलापूर मंगल उद्योग समूहाचे सतीशचंद्र देशमुख म्हणाले की, संगमनेरच्या सहकार हा पश्चिम महाराष्ट्रासाठी मॉडेल आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची तत्व राज्यातील सर्व सहकारात जर उपयोगात आली तर नक्कीच त्या सहकारातून त्या परिसरात समृद्धी वाढेल हा विश्वास देणारा हा परिसर असल्याचे ते म्हणाले.

















