राजापूर, गुंजाळवाडी, वेल्हाळे गावांना मोठा दिलासा

शेतकरी हा राबराब राबून मोठ्या कष्टाने पीक घेत असतो. मात्र विजेअभावी त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. कमी दाबाने वीज मिळाल्यामुळे शेतीपंप व्यवस्थित चालत नव्हते, पिकांना पाणी देण्यात अडथळे येत होते आणि उत्पादनावरही परिणाम होत होता. याबाबत नागरिक व शेतकर्यांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला. आता ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात आल्याने या गावांतील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार असून पुढील काळातही वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील.
आ. अमोल खताळ
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रावरील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत 5 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर 10 एमव्हीएमध्ये रूपांतरित केला आहे. त्यामुळे राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे या गावांतील विजेच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विविध वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त भार येत असल्याने शेतकर्यांना कमी दाबाने व अपुर्या प्रमाणात वीजपुरवठा होत होता. परिणामी शेतीपंप सुरळीत चालवण्यात अडचणी निर्माण होत होत्या. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी महावितरण प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही उपकेंद्रांवरील 5 एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर 10 एमव्हीए करण्यात आले, तर काही ठिकाणी 10 एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर 20 एमव्हीए करण्यात आले.
या क्षमतेवाढीमुळे ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त भार कमी झाला असून आता शेतकर्यांना मुबलक व सुरळीत वीजपुरवठा मिळू लागला आहे. राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील विजेचा ताण कमी झाल्याने शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.





















