अकोलेकरांचा संगमनेरात एल्गार

0
351

सेमी हायस्पीड रेल्वे अकोले – संगमनेर मार्गेच न्या…

देवठाण स्थानकासाठी साथ द्या नाहीतर पाणी बंद करू – अकोलेकरांचा संगमनेरच्या नेत्यांना इशारा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही कोणत्याही परिस्थितीत अकोले, संगमनेर मार्गीच गेली पाहिजे. या मार्गावर सर्वेक्षण, भूसंपादन देखील झालेले आहे. असे असताना हा मार्ग अचानक का बदलला गेला? खोदड केंद्राबद्दल पहिले माहित नव्हते का? हा नवा मार्ग जर अस्तित्वात आला तर या दोन्ही तालुक्याचा विकास शंभर वर्षे मागे जाईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग बदलू नये व बदलू देणार नाही असा इशारा देत अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरीकांनी संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.


संगमनेर मार्गे नियोजित असलेला नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग अचानक बदलला गेला. त्यामुळे संगमनेर सह अकोलेकरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. संगमनेकरांनी याबाबत आंदोलन सुरू केले असताना आता अकोलेकर देखील आक्रमक झाले आहे. आज मंगळवारी अकोलेकर, सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते एकत्र येत अकोले शहर बंद ठेवण्यात आले. तर अकोले ते संगमनेर असा हजारों नागरीकांचा भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अभी नहीं तो कभी नहीं अशा घोषणा देत हा मोर्चा संगमनेरातील प्रांत कार्यालयावर धडकला. या मोर्चात आ. डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजीत तांबे, डॉ. अजीत नवले, अमित भांगरे, बाजीराव दराडे, कॉ. कारभारी उगले, सौ. निलम अमोल खताळ, प्रदिप हासे, विनय सावंत, अ‍ॅड. वसंत मनकर, विजय वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, यांच्यासह अनेक मान्यवर व नागरीक सहभागी झाले होते.


या प्रकल्प कामाची कागदी कार्यवाही 2020 दरम्यान सुरू झाली होती. पुणे-चाकण- नारायणगाव- संगमनेर मार्गे रेल्वेमार्गाचा तेव्हाचा अंदाजित खर्च 16000 कोटी रूपये होता. ह्या मार्गाची संगमनेर मार्गे एकूण लांबी 235 किमी आहे. काही ठिकाणी या कामासाठीचे सर्वेक्षण, भूसंपादनाचे कामही सुरू झाले होते. काही ठिकाणी खरेदीखतेही झालीत व मोबदलाही दिला गेलाय. या मार्गावर पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील एकूण 24 स्थानके प्रस्तावीत होती. पुणे हडपसर मार्गे ही मार्गिका चाकण, राजगुरूनगर, नारायणगांव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर अशी नाशिकरोड या सध्याच्या नाशिकरोड रेल्वेस्थानकापाशी येऊन थांबेल असे प्रस्तावित होते. आणि आता हीच रेल्वे पुणे, अहिल्यानगर, पुणतांबा शिर्डीमार्गे नाशिकला आणावी असा नविन पर्याय अभ्यासला, की माथी मारला जात आहे. या मार्गावर फार फार तर चाकण व सिन्नर ला थोडाफार फायदा होईल. पण रेल्वेरूळांकडे आस लावून बसलेल्या राजगुरूनगर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर या गावांच्या तोंडाला पानेच पुसली जातायत. आसपासच्या अकोले, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यासारख्या अनेक डोंगराळ गावांनाही याचा फायदा मिळणार होता त्याचे काय? या आदीवासी पट्ट्यातील कित्येक लोकांनी अद्यापही आगिनगाडी पाहिलेली नाही. आता हा नाशिक- पुणे मार्ग बदलण्यासाठीचे कारण जीएमआरटी रेडिओ दुर्बीण हे एकमेव कारण दिले जाते. त्याला पर्याय शोधवा अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले की, कोव्हिडच्या काळामध्ये रेल्वेचा मुद्दा प्रकर्षाने आला. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी 2021 साली ऑनलाईन बैठक घेतली होती, त्या बैठकीला मी सुध्दा उपस्थित होतो. त्यावेळी रेल्वेमार्ग अकोल्यातून जाणार असल्याने सर्वजण आनंदित होतो. काही जण म्हटले रेल्वे होईल तेव्हा होईल आधी देवठाण-अकोले, संगमनेरला जाणारा रस्ता करा आम्ही तो रस्ता केला. अकोल्यामधअये आरोग्य सुविधा, अम्ब्युलन्स, २५० शाळा खोल्या आदी प्राथमिक सुविधा मी निर्माण केल्या. रेल्वेमार्गासाठी विनय सावंत आणि जालिंदर वाकचौरे यांना बरोबर घेवून मी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. आम्ही सतत काम करतोय आणि काही जण आम्हालाच प्रश्न विचारताय. अरे ४०-५० वर्ष जे होते त्यांना तुम्ही प्रश्न विचारा, खासदारांना प्रश्न विचारा. जो काम करतोय त्याला कशाला छेडता? आज निवेदन द्यायला आल्यानंतर सर्वच आमदारांना तुम्ही सुनावले. तुम्ही जसे चळवळीचे कार्यकर्ते आहात तसा मी सुध्दा चळवळीचा कार्यकर्ता आहे. तुमच्यासाठीच, कामासाठीच मी वरिष्ठ पातळीवर भांडतोय. अकोलेच्या विकासासाठी भांडतोय. मी मुख्यमंत्र्यांना शहापूर, अकोले, शिर्डीमार्गाचे पत्र सुध्दा दिलेले आहे. आता राजकारण न करता सर्वांनी एकत्र आले पाहिजे असेही आ. लहामटे म्हणाले. सकाळी ९ वाजल्यापासून झटणारे अकोले तालुका कृती समिती, अकोल्याचे सर्व नागरिक यांचे आ. लहामटे यांनी यावेळी आभार मानले.

आमदार अमोल खताळ यांनी यावेळी सांगितले की, रेल्वेचा प्रश्न अकोलेकरांसाठी सुध्दा तेवढाच महत्वाचा आहे जेवढा संगमनेरकरांसाठी आहे. संगमनेर आणि अकोल्याची माणसे आंदोलनातून घडत गेली आहेत. मी सुध्दा आंदोलनातून आमदार झालेलो सामान्य कार्यकर्ता आहे. अकोलेकरांशी माझे नाते अतूट आहे. माझी मावशी अकोल्याची आहे. आई आणि मावशीमध्ये कोणताही फरक नसतो तसेच नाते माझे सुध्दा अकोलेकरांबरोबरच आहे. संगमनेरचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी विधानसभेमध्ये बोर्ड घेवून रेल्वेप्रश्नी आवाज उठवला तसाच आवाज आमदार लहामटे यांनी सुध्दा उठवला. मला येवून १ वर्ष झाले आहे. ज्यांनी ४० वर्ष सत्ता भोगली त्यांनी १९८०, १९९० निदान २००० मध्ये तरी रेल्वे आणायला पाहिजे होती. असो, मी आता तुमच्या सर्वांच्या बरोबर आहे. अगदी मुख्यमंत्री असो किंवा दिल्ली असो मी तुमच्या सर्वांबरोबर आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयार आहे. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव पुढे करून काही जण राजकारण करीत आहेत. मात्र पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की रेल्वे शिर्डीमार्गे गेली याबाबत मला कुठलीही कल्पना नव्हती. ना. विखे पाटील सुध्दा या प्रश्नी लक्ष घालणार असल्याचे यावेळी आमदार खताळ यांनी सांगितले.

आमदार सत्यजीत तांबे यावेळी म्हणाले की, अकोले आणि संगमनेर वेगळे नाही. रेल्वे अकोले मार्गे जाण्यासाठी सुध्दा मी प्रयत्न करणार आहे. खोडद च्या GMRT चा मुद्दा मध्ये टाकून रेल्वेमार्गामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी स्वत: रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना भेटणार आहे. बाळासाहेब थोरात साहेब कालच वैष्णव साहेबांना भेटून आले आहेत. अर्धा तास त्यांनी जुन्या मार्गाचा आढावा यावेळी दिला. नाशिक-पुणे-मुंबई गोल्डन ट्रँगल असून भविष्यातील पिढ्या या घडण्याच्या दृष्टीने हा रेल्वेमार्ग अतिशय महत्वाचा आहे. यापुढे आंदोलनात संगमनेर अकोले या नावाचा ठळक उल्लेख असेल असेही आमदार तांबे यावेळी म्हणाले.

बाजीराव दराडे, कॉ. कारभारी उगले, प्रदिप हासे, विनय सावंत, अ‍ॅड. वसंत मनकर, विजय वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, जालिंदर वाकचौरे आदी सर्वांनीच आक्रमक पवित्रा यावेळी घेतला. आमदार तांबे असोत किंवा आमदार खताळ असोत या दोघांनीही सर्व आमदार आणि खासदारांना बरोबर घेवून अकोल्याचा प्रश्न मांडला पाहिजे. संगमनेरचा विकास हा अकोल्याच्या पाण्यामुळे आणि समृध्दीमुळे झाला आहे. अशा वेळी आम्ही भोळ्यासारखे राहिलो. तुमचे ऐकत गेलो मात्र आता तसे होणार नाही. रेल्वेमार्ग सिन्नर, देवठाण स्थानक, संगमनेर स्थानक असाच गेला पाहिजे आणि तुम्हा दोन्ही आमदारांची भूमिका सुध्दा तशीच पाहिजे असे या मान्यवरांनी सांगितले. यावेळी अकोले-शिर्डी रस्त्याची दुसरी मागणीही करण्यात आली.

विनय सावंत यावेळी म्हणाले की, आमदार सत्यजीत तांबे यांच्या विधान परिषदेतील भाषणात, पत्रात कुठेही अकोल्याचा उल्लेख नाही. असे करून चालणार नाही तुम्हाला अकोल्याच्या बाजूने उभे रहावेच लागेल नाहीतर संगमनेरचे पाणी आम्ही बंद करू. आम्ही जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत. आम्हाला डिवचण्याचा कोणी प्रयत्न करू नका.

कॉ. अजित नवले यांनी सर्वच नेत्यांना फैलावर घेतले. आमदार सत्यजीत तांबे असोत, आमदार खताळ असोत आम्हाला राजकारणाशी घेणेदेणे नाही. तुम्ही अकोल्यासाठी उभे राहिले पाहिजे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कार्यकाळात अधिग्रहण झाले. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जबाबदारी झटकू नये. आता सत्यजीत बघतात या वल्गना सुध्दा करू नये. दुसरीकडे त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा समाचार घेतला. तुम्हाला शिर्डीमार्गे रेल्वेमार्ग कसा गेला हे माहित नाही म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांचा तुमच्या अविश्वास आहे आणि जर तुम्हाला माहित आहे तर आता तुम्ही आमच्याबरोबर आले पाहिजे. मागे पाणी सोडले तेव्हा प्रचंड पूर आला. या पुरामध्ये दोन जण वाहून गेले त्यांना शोधण्यासाठी पाणी बंद करा अशी विनंती तुम्हाला केली होती. तुम्ही पाणी बंद केले नाही. NDRF आणि आमचा एक तरूण शोधण्यासाठी गेले असता ते सुध्दा वाहून गेले. त्यांना ५० लाख रूपये देणार असे सांगितले होते. अजून ती मदत आली नाही. तुम्ही अकोल्यात येणार आहात त्यावेळी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे द्या. एकूणच जिल्ह्यातील सर्व राजकारण्यांचा समाचार यावेळी कॉ. अजित नवले यांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here