१२ जानेवारीला महामार्गावर चक्काजाम आंदोलन

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. विकास क्रांती सेनेसह विविध रेल्वे कृती समित्यांनी येत्या 12 जानेवारीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
या आंदोलनाच्या नियोजनासाठी संगमनेर तालुक्यातील बोटा येथे महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्वांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे आपल्या मागण्या कळवल्या असून आता 12 जानेवारीच्या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबेगाव, जुन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यातील जनता या बहुउद्देशीय पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची प्रतीक्षा करत आहे. मात्र, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून अहिल्यानगर, शिर्डी, सिन्नर ते नाशिक अशा नवीन मार्गाची घोषणा केल्याने स्थानिक जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

विकास क्रांती सेनेच्या प्रमुखांच्या मते, गेल्या पाच वर्षांपासून या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही जनतेची दिशाभूल होत असल्याने आता तिसर्या टप्प्यातील मोठे आंदोलन छेडण्यात येत आहे. या लढ्यात बोटा येथे रेल्वे स्टेशन उभारण्याची मागणी प्रामुख्याने लावून धरण्यात आली आहे. संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या बोटा येथे स्टेशन झाल्यास या भागातील कृषी आणि पर्यटन क्षेत्राला मोठी भरभराट मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. जोपर्यंत रेल्वे प्रकल्पाबाबत ठोस निर्णय येत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला असून, आंदोलनाच्या दिवशी संगमनेर व अकोले तालुक्यातील पठार भागातील सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीसाठी परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये इंजिनिअर संतोष फापाळे, भगवानदादा काळे, सरपंच जालिंदर गागरे, सरपंच पांडुरंग शेळके, सुहास वाळुंज, संभाजी बोडके, स्वप्नील हलवळे, गणेश हलवळे, किशोर फापाळे, राहुल ठेंबरे, मुनीर शेख, चंद्रकांत गोंदके, शेखर काळे, रमेश आहेर, पूजाताई सोनवणे, पत्रकार सतीश फापाळे, बाळासाहेब कुर्हाडे, बबन शेळके, संदीप दातखिळे, अनंतराव चौगुले, चंद्रकांत फापाळे, शांता घुले, भास्कर भारती, तसेच दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, शिवमुद्रा फाउंडेशन आणि छावा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.





















