महामार्गावर जीवघेणा प्रवास आणखी किती दिवस ?

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – विकासकामांची उजळणी करत श्रेय घेणारे लोकप्रतिनिधी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दयनीय अवस्थेकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः नाशिक टोलनाका ते संगमनेर या मार्गाची अवस्था अत्यंत खराब असून या रस्त्यावरून प्रवास करणे दिवसेंदिवस अधिकच धोकादायक ठरत आहे.

नांदूर शिंगोटे ते सिन्नर व सिन्नर एमआयडीसीपर्यंतचा प्रवास जिवावर बेतणारा झाला आहे. एका बाजूने नवीन रस्त्याचे काम सुरू असताना कर्हे घाट परिसरात दुसर्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे, मात्र या मार्गावर प्रचंड खड्डे पडले असून अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक, सिन्नर, अकोले व संगमनेर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
नाशिक-पुणे महामार्ग काही ठिकाणी सहा पदरी तर काही ठिकाणी सिमेंट काँक्रेटचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथ गतीने सुरू असून पर्यायी वाहतुकीचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या मार्गावरचा प्रवास अतिशय कंटाळवाणा, धोकादायक झाला आहे.

विशेषतः शिंदे-पळसे व संगमनेर-हिवरगाव येथील टोलनाके बंद करण्यात यावेत, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली आहे. नाक दाबले की तोंड आपोआप उघडेल या म्हणीप्रमाणे टोलनाक्यांवर कारवाई झाली तर प्रशासन हालचालीला येईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच पुणे-नाशिक महामार्गावरून धावणार्या सर्व बसेस संगमनेर बसस्थानकात थांबाव्यात, यासाठी आग्रही भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच ज्या ठिकाणी अधिकृत बसथांबे आहेत, त्या ठिकाणी 30 रुपयांत चहा व नाश्ता देण्याच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, याकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही कोणत्याही पक्षाची नव्हे, तर सर्वसामान्य जनतेची रास्त मागणी आहे. लोकप्रतिनिधी केव्हा जागे होतील आणि पुणे-नाशिक महामार्गावरून प्रवास करणार्या हजारो नागरिकांना दिलासा मिळेल, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याबाबत सेवानिवृत्त दुरसंचार अधिकारी ज्ञानेश्वर गायकर यांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन दिले आहे.


















