मार्ग बदलल्याने संगमनेर, अकोलेकर होणार आक्रमक

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे वळवण्याच्या निर्णयाविरोधात संगमनेर, सिन्नर, नारायणगाव, खेड-मंचर, आंबेगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विकासाचा मूळ मार्ग बदलला गेल्याने या पट्ट्यातील औद्योगीक विकास, शेती उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. भविष्यातील विकासाला यामुळे मोठी खिळ बसणार आहे. याचा विचार शासनाने केला नाही. अशा शब्दांत नागरिकांनी सत्ताधारी जनप्रतिनिधींवर रोष व्यक्त केला असून मार्ग बदल रद्द करा, रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावा या मागणीसाठी सुरू झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनास प्रचंड प्रतिसाद मिळत असून भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

आ. सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या सह्या मोहीम, डिजिटल कॅम्पेनिंग आणि ऑनलाईन पिटीशनला अवघ्या काही तासांत हजारो नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा सातत्याने वाढत असून संगमनेरसह अकोले व या मार्गावरील तीनही जिल्ह्यातील अनेक तालुके अक्रमकपणे या लढ्यात सहभागी होत आहे. भविष्यात भव्य जनआंदोलन उभारण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी शासनकाळात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेल्वे प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. महारेलमार्फत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि शेतकर्यांना भरपाईही मिळाली होती. मात्र सरकार बदलताच प्रकल्प शिर्डीमार्गे वळवण्यात आला यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. नव्याने होत असलेला नाशिक, शिर्डी, नगर, पुणे या रेल्वेमार्गाचा खरे तर काहीही उपयोग होणार नाही. कारण या मार्गावर पुर्वीपासूनच रेल्वे मार्ग अस्तित्वात आहे. मात्र नाशिक, पुणे या औद्योगीक पट्ट्यातम मोठ्या प्रमाणावर औद्योगीक क्षेत्र आहे. त्याचबरोबर कृषी पुरक व्यवसाय आहे. हा मार्ग येथून झाल्यास येथील विकासाला चालना मिळेल.

लोकसभेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमार्ग शिर्डीमार्गेच जाईल असे स्पष्ट केल्यानंतर संघर्षाची ठिणगी पेटली. 235 कि.मी. प्रस्तावित सेमी-हायस्पीड रेल्वे नाशिक-पुणे या महत्त्वपूर्ण औद्योगिक शहरांना थेट जोडणार होती. या मार्गामुळे संगमनेरसह परिसरातील व्यापार, वैद्यकीय सेवा, शिक्षण क्षेत्र, शेती आणि उद्योगांना मोठा वेग मिळणार होता. नागरिकांच्या मते, रेल्वेमार्ग बदल हा संगमनेरच्या एकूण विकासाला मोठा धक्का आहे.
संगमनेरजवळील आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग, प्रस्तावित सुरत-हैदराबाद महामार्ग, निळवंडे कालवा आणि चौपदरी नाशिक-पुणे महामार्ग या प्रकल्पांनंतर रेल्वेमार्ग हा विकासाचा मोठा टप्पा ठरणार होता. मार्ग बदलल्यानंतर मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी ‘मूक भूमिका’ घेतल्याबद्दल आंदोलकांनी टीका केली आहे.
दरम्यान नागपूर हिवाळी अधिवेशनातही या आंदोलनाचे पडसाद उमटले. आ. अमोल खताळ यांनी ‘पुणे-नाशिक रेल्वे संगमनेर मार्गे गेलीच पाहिजे’ असे लिहिलेला टी-शर्ट घालून आणि फलक हातात घेऊन लक्षवेधी निदर्शने केली. तर आ. डॉ. किरण लहामटे यांनी देखील या आांदोलनात सक्रिय भुमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.


















