आरोपीच्या आईची आमदार विरुद्ध पोलिसात तक्रार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरण राजकीय वादातून नाही तर आर्थिक वादातून झाले असल्याचे पुढे असल्याचे आरोपीच्या आई अनिता गुंजाळ यांनी नमूद केले आहे. आमदार खताळ आणि हल्लेखोर प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्यात मैत्रीचे व आर्थिक संबंध होते, प्रसाद गुंजाळ याने आ. अमोल खताळ यांच्या मध्यस्थीने काही मोठे आर्थिक व्यवहार केले त्यामुळे तो अडचणीत आला होता. त्याला या अडचणीतून बाहेर काढण्याऐवजी आणखीन अडचणीत लोटले जात होते त्यामुळे प्रसाद याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे असेही प्रसाद गुंजाळ याची आई अनिता गुंजाळ यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका, हा आमचा खाजगी विषय आहे यामध्ये राजकारण आले तर आम्हाला न्याय मिळणार नाही अशी भूमिका अनिता गुंजाळ यांनी व्यक्त केली. यावेळी नोंदणीकृत दस्त (नोटरी), वकिलान मार्फत आलेली रजिस्टर नोटीस, आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी अमोल खताळ यांनी दिलेली शिफारस, ही सर्व कागदपत्रे तक्रारी सोबत त्यांनी जोडली असून तसे निवेदन शहर पोलिसांना दिले आहे.
दरम्यान आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून मी त्या घटनेचे समर्थन करत नाही, परंतु या घटनेचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही. झालेली घटना ही आर्थिक देवाण-घेवाण आणि माझ्या मुलाच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीतून घडलेली आहे.
सौ. गुंजाळ यांनी पुढे म्हटले की, माझ्या मुलाला अमोल खताळ यांनी अनेक वेळा फसवलेले आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून माझा मुलगा प्रचंड मानसिक तणावात होता. आमच्या घरी वारंवार पोलीस गाड्या पाठवून, त्याला ब्लॅकमेल केले गेले, त्याच्यावर दबाव टाकला गेला. त्याने बर्याच वेळा आत्महत्येचा देखील विचार केला होता.
आमदार अमोल खताळ आणि प्रसाद गुंजाळ हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. अनेक कौटुंबिक कार्यक्रम त्यांनी एकत्र साजरे केलेले आहेत. वाढदिवसही एकत्र साजरे केलेले आहेत. माझ्या मुलाबरोबर अमोल खताळ यांचे बरेच आर्थिक व्यवहार होते. प्रसाद हा शेअर मार्केटमध्ये काम करायचा, त्यामध्ये गुंतवणुकीसाठी अमोल खताळ यांच्या मध्यस्थीने आणि त्यांच्यासमोरच काही आर्थिक देवाण-घेवाण झालेली आहे. यातील बरेच व्यवहार रोखीने झालेले होते, तसेच त्याची नोटरी ही झालेली आहे. या नोटरी वरूनच सदर देवाण-घेवाण अमोल खताळ यांच्या कार्यालयातच झालेली आहे. याबाबतचे सर्व कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत.
शेअर बाजारात मुलाला अपयश आल्यानंतर लोकांचे देणे देण्यासाठी त्याला त्याच्या वाट्याची जमीन दिली, ती त्याने विकली व त्यातून लोकांचे देणे दिले. पैसे त्याने चेकने बँकेच्या अकाउंट वरूनच परत केलेले आहे, तरीही बँकेत त्यांच्याकडे असलेले चेक पुन्हा टाकून त्याला फसवले गेले.
या सर्व संदर्भाने संगमनेर पोलीस स्टेशनमध्येच 2024 मध्ये अमोल खताळ, तेव्हाचे पोलिस निरीक्षक मथुरे, माझे पती, मुलगा आणि ज्यांना पैसे द्यायचे होते त्यांची एकत्रित बैठकही झाली होती. पोलिसांना ते सर्व ठाऊक आहे. मागील काही दिवसांपासून त्याला सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या, त्याला ब्लॅकमेल केले जात होते, त्याच्यावर दबाव टाकला जात होता, तो प्रचंड मानसिक तणावात होता. याशिवाय माझा मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून सारखा अमोल खताळ यांना भेटायचा आणि माझा विषय मिटवून द्या असे सांगायचा.
शेवटी उद्विग्न अवस्थेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचललेले आहे. मी त्याचे कोणतेही समर्थन करणार नाही. मात्र त्याला या टोकापर्यंत पोहोचायला भाग पाडणार्यांना मी आई म्हणून कधीही माफ करणार नाही, असेही सौ. गुंजाळ म्हणाल्या. आमच्या कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी, मुलाची फसवनुक केल्याप्रकरणी, आमच्यावर प्रचंड दबाव निर्माण केल्याप्रकरणी अमोल धोंडीबा खताळ, संदेश देशमुख यांच्यासह दोषी असणार्या व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
पोलिसांना दिलेल्या कागदपत्रांमध्ये 18 मार्च 2024 रोजी केलेला नोंदणीकृत दस्त आहे. यामध्ये अमोल धोंडीबा खताळ यांच्या कार्यालयात 32 लाख 50 हजार रुपयांची देवाणघेवाण 21 ऑक्टोबर 2023 रोजी झाल्याचे नमूद आहे. शिवाय ही सर्व देवाणघेवाण अमोल खताळ आणि विक्रमसिंह वसंतराव गुंजाळ यांच्या साक्षीने आणि मध्यस्थीने झालेली आहे.
तसेच या कागदपत्रांमध्ये प्रसाद गुंजाळ एका विषयान्वये विखे पाटील यांना भेटू इच्छित होता, त्यासाठी अमोल खताळ यांनी शिफारस केल्याचेही कागदपत्रे अनिता गुंजाळ यांनी तक्रारी सोबत जोडलेले आहेत.
यात असेही म्हटले आहे की, मुलावर प्रचंड दबाव निर्माण करून त्याची फसवणूक होत होती, हे सांगण्यासाठी त्याने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांना आणि त्यांच्या कार्यालयालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही त्याला मदत केली नाही. त्यामुळे या घटनेला तेही दोषी आहेत असा आरोप अनिता गुंजाळ यांनी केला.
आमदार खताळांचा संबंध नाही – देशमुख

प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले सर्व व्यवहार हे वैयक्तिक असून, आमदार अमोल खताळ यांचा त्यात कोणताही संबंध नसल्याचे रविंद्र देशमुख यांनी स्पष्ट केले. राजकीय हेतूने या व्यवहारांचा वापर होऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
देशमुख यांनी सांगितले की, प्रसाद गुंजाळ शेअर ट्रेडिंगमध्ये अडचणीत सापडल्याने सप्टेंबर 2023 मध्ये त्यांनी 32 लाख 50 हजार रुपये दिले. काही रक्कम परत मिळाली, मात्र दिलेले धनादेश वटले नाहीत. त्यावर नोटीस पाठवून कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. गुंजाळ यांच्या मातोश्रींनीही देणेदारी मान्य केली असल्याचे देशमुख म्हणाले. तरीही गुंजाळ यांनी राजकीय दबावाखाली आमदार खताळ यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असा आरोप त्यांनी केला. स्वामीप्रसाद डाके यांनीही स्पष्ट केले की, गुंजाळ यांनी त्यांच्याकडे 50 लाख रुपये मागून घेतले. दिलेला धनादेश, स्टॉप पेमेंट झाल्याने परत आला असून, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अॅड. संग्राम जोंधळे यांनीही समाजमाध्यमांवरील चर्चेत गुंजाळ यांना मोठी देणेदारी असल्याचे स्पष्ट केले आहे.
राजकीय षडयंत्रातून गुन्हा – खेमनर

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा स्वीय सहाय्यक म्हणून भास्कर खेमनर हे काम पहातात. या हल्ल्यानंतर त्यांच्यावर संशयाची सुई आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. परंतु याबाबत खेमनर यांनी म्हटले आहे की, मला दररोज विविध कामांच्या निमित्ताने शेकडो फोन येत असतात, त्यातील बर्याच लोकांचे नंबर माझ्या मोबाईल मध्ये सेव्हही नसतात. लोक साहेबांच्या भेटीसाठी वेळ मागतात किंवा काही शासकीय कामकाज सांगत असतात.
आमदार खताळ हल्ला प्रकरणातील आरोपीने मला 22 ते 25 तारखेच्या दरम्यान एक दोन वेळा फोन केले होते, त्याने मला ’साहेब कुठे भेटतील’ एवढेच विचारले. पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार त्याने मला काही व्हाट्सअप मेसेज केले होते. व्हाट्सअप वर मला बरेच मेसेज दररोज येत असतात, अनेक मेसेज मी वाचतही नाही. प्रसाद गुंजाळ याने मला काय पाठवले हे मला आजही माहित नाही. त्याच्या कोणत्याही मेसेजला माझ्याकडून उत्तर गेलेले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी प्रसाद गुंजाळ नावाच्या या व्यक्तीला ओळखतही नाही.
साहेबांना भेटण्याची विचारणा करणार्या त्या 15 ते 20 सेकंदाच्या फोन पलीकडे त्याचे माझे आजवर कोणतेही बोलणे नाही. या घटनेशीही माझा दूरपर्यंत संबंध नाही. मुळात या व्यक्तिगत व्यवहाराच्या प्रकरणाला राजकीय स्वरूप देण्याच्या दृष्टीने माझ्यावर हे षडयंत्र केले गेले आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा निरपेक्ष तपास करावा, त्यांना पाहिजे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. मुळात हे संपूर्ण प्रकरण वैयक्तिक व्यवहाराचे असताना, त्यात राजकारण आणले गेले.