गुंजाळवाडी, कासारा दुमाला, राजापूर, घुलेवाडी, समनापूर रहिवाशांना दिलासा मिळणार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, कासारा दुमाला, राजापूर, घुलेवाडी आणि समनापुर या भागातील जमिनीवरील अनाधिकृत व पोकळीस्त नोंदीं रद्द होणेबाबत आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत वरील गावातील पोकळीस्थ जागेवरील नोंदी रद्द करणे बाबत निवेदन देऊन पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून महसूलमंत्री बावनकुळे यांनी महसूल अधिकार्यांची बैठक बोलावून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि वरील गावातील रहिवाशांना न्याय दिला जाईल असे आश्वासन आ. अमोल खताळ यांना दिले आहे.
मी स्वतः मागेच महसूलमंत्री बावनकुळे साहेबांची भेट घेऊन सर्वे नं. 106 चा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर 104, 105 आणि 219 मधील नागरिकांनी देखील माझी भेट घेऊन निवेदन दिले. त्या अनुषंगाने मी पुन्हा मंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी तात्काळ या विषयात बैठक घेण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत. लवकरच या प्रकरणावरही ठोस निर्णय अपेक्षित आहे.
- आ. अमोल खताळ
गेल्या 50 ते 60 वर्षांपासून एका गंभीर अन्यायाला सामोरे जात होते. त्यांच्या जमिनी, घरांच्या जागा, शेतजमीन आणि राहत्या मिळकतींवर पोकळीस्त व इतर हक्कांतील कब्जेदार म्हणून अनधिकृत नोंदी करण्यात आल्या होत्या. या नोंदींमुळे संबंधित नागरिकांना बँक कर्ज, शिक्षण प्रमाणपत्र, कायदेशीर व्यवहार, पाणी-जोडणी, घरपट्टी, नळपट्टीसह सर्व नागरी सुविधांपासून वंचित राहावं लागत होते. तसेच शेतजमिनीच्या नोंदी न झाल्यामुळे काही परिवारात देखील वाद होत होते. तर काहींना तर धमक्याही दिल्या जात होत्या. सदर अन्यायाविरोधात संबंधित नागरिकांनी आ. अमोल खताळ पाटील यांच्याकडे निवेदने सादर केली. याची तात्काळ दखल घेत, आ. खताळ यांनी महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना विविध निवेदनांद्वारे समस्या सविस्तर मांडली असून संबंधित नोंदी रद्द करून मूळ ताबेदारांना न्याय मिळावा यासाठी हस्तक्षेप करण्यासाठी बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.

या प्रकारामुळे मूळ जमीनमालकांच्या कायदेशीर हक्कांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्यावर आ.अमोल खताळ यांनी याबाबत महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना विस्तृत निवेदन सादर करत, गुंजाळवाडी, कासारा दुमाला, समनापूर आणि राजापूर या गावांमधील विविध गट नंबरांवरील पोकळीस्त नोंदी त्वरित रद्द करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती केली गुंजाळवाडी गट क्र. 79, 92 कासारा दुमाला गट क्र. 32, 36, 37, 32,38 समनापूर – गट क्र. 56 राजापूर – गट क्र. 28,38,30जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समवेत कॅबिनेट बैठक संपल्यावर महसूलमंत्री यांची भेट घेऊन, या विषयावर बैठक बोलावून विषय लवकर मार्गी लावावा अशी मागणी यावेळी आ. अमोल खताळ यांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली. या भेटीत मंत्री बावनकुळे यांनी सविस्तर सर्व माहिती कागदपत्रे मागवून अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन विषय लवकर मार्गी लावणार आहे असे आश्वासन दिले.




















