अकोले बनले पठारावरील पाईपलाईनचा अडथळा ?

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले – तालुक्यातील पिंपळगाव खांड लघुपाटबंधारे जलाशयातून संगमनेर तालुक्यातील पठार भागातील 13 गावांसह 18 वाड्या-वस्त्यांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणी योजनेसाठी लोखंडी पाईपने भरलेले चार कंटेनर रविवारी (ता. 25) दुपारी दीडच्या सुमारास आले. मात्र अकोलेतील ग्रामस्थांनी हे पाईप उतरविण्यास विरोध केला. यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी संबंधितांशी चर्चा केली. मात्र त्यांची शिष्टाई निष्फळ ठरली. त्यामुळे वाहने मागे पाठविण्यात आली.

पिंपळगाव खांड प्रकल्पातून पठारावरील गावांना जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन करण्यास मुळा खोर्यातूने तीव्र विरोध होत आहे. याच प्रश्नावरून 7 नोव्हेंबर 2023 रोजी सुगाव बुद्रुक येथे कोल्हार-घोटी राज्यमार्गावर रास्तारीको आंदोलन करण्यात आले होते. सीताराम पाटील गायकर, उल्हास गोडसे, भाजप नेते गिरजाजी जाधव, लिंगदेवचे सरपंच अमित घोमल, सीताराम लांडे, श्री. कानवडे, डी. बी. फाफाळे, रेश्मा गोडसे यांनी संगमनेर तालुक्यातील पठारावर पाणी नेण्यास तीव्र विरोध केला होता. तसेच पिंपळगावखांड प्रकल्पातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत पठारावरील गावांना एक थेंबही पाणी जाऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

रविवारी पाईप घेऊन वाहने आल्याची माहिती मिळताच अकोलेतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाईप उतरविण्यास विरोध केला. घटनेची माहिती मिळताच आमदार खताळही घटनास्थळी आले. त्यांनी पाईप उतरविण्यास विरोध करणार्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख प्रभाकर फापाळे म्हणाले की, पिंपळगाव खांड जलाशयात पाणी कमी आहे. आहे तेच शेतीला अपुरे पडते. काहीही झाले तरी पाईप आम्ही उतरू देणार नाही. योजनेसाठी स्वतंत्र पाणीसाठा तयार करावा असे ते म्हणाले. आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही नवीन उद्भव शोधल्यावरच ही नळ योजना होईल असा विश्वास दिला आहे.
www.yuvavarta.com https://x.com/yuvavarta https://www.facebook.com/dailyyuvavarta