8 फेब्रुवारी रोजी रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरी सत्कार

संगमनेर- आयुष्यभर तमाशा या लोककलेचे जतन, संवर्धन करत कलाप्रेमींचे मनोरंजन व समाज प्रबोधन करणारे महाराष्ट्राचे भूषण असणारे संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. तुकाराम खेडकर व कांताबाई सातारकर यांचे सुपुत्र तसेच अखिल भारतीय तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष मास्टर रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारकडून लोककला क्षेत्रातील सर्वोच्च असा पद्म पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेमुळे संपूर्ण तमाशा कला क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यानिमित्ताने संगमनेरचा डंका देशात वाजला आहे. संगमनेर ही लोककलावंतांची पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. शाहीर कवी अनंत फंदी, प्रथम महिला तमाशा कलावंत पवळा भालेराव हिवरगावकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर तसेच ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर व रघूवीर खेडकर हे संगमनेरचे भूषण मानले जातात. महाराष्ट्राच्या या सोंगाड्याचा पद्मश्री पुरस्काराने गौरव होणार असल्याने संगमनेरकरांची मान आणि प्रतिष्ठा उंचावली आहे.
युवावार्ता (प्रतिनिधी)-
तमाशासम्राज्ञी स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा घेऊन लोककलेच्या माध्यमातून संगमनेरचे नाव राज्याच्या कानाकोपर्यात पोहोचवणारे लोककलावंत रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला असून ही संगमनेरकरांसाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. आयुष्यभर लोककलेची सेवा करणार्या पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा संगमनेरकरांच्यावतीने रविवार 8 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
संगमनेरकरांच्यावतीने आयोजित भव्य नागरिक सत्कार बाबत माहिती देताना आमदार सत्यजीत तांबे पुढे म्हणाले की, तमाशा ही महाराष्ट्राची प्रमुख लोककला आहे .स्वर्गीय कांताबाई सातारकर व रघुवीर खेडकर यांनी अत्यंत समर्पित भावनेने या लोककलेला आपले आयुष्य वाहिले. कांताबाई सातारकर यांच्यानंतर रघुवीर खेडकर यांनी लोककलेचा हा वारसा पुढे नेताना देशपातळीवरील तमाशा फड मालकांच्या संघटनेचे अध्यक्षपद सांभाळले. या माध्यमातून लोक कलावंतांच्या विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला.
सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तमाशा ही लोककला लोप पावते की काय अशी भीती निर्माण झाली आहे अशा अडचणीच्या परिस्थितीतही रघुवीर खेडकर अत्यंत समर्थपणे ही लोककला पुढे नेत आहे. विनोदी अभिनेता, सोंगाड्या, हजरजबाबी भूमिका वगनाट्यातील प्रभावी अभिनय पारंपारिक लावणी नृत्य आणि समई आणि थाळी नृत्य यामुळे महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात त्यांचे मोठे स्थान निर्माण केले आहे.
संगमनेरला कवी अनंत फंदी, पवळा हिवरगावकर, विठ्ठल उमप अशा मोठ्या लोककलावंतांची परंपरा असून संगमनेर ने कायम कलावंत आणि संतांचा आदर केला आहे. रघुवीर खेडकर यांचा पद्मश्री पुरस्काराने झालेला सन्मान हा संगमनेर शहर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक, समाज , विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संघटना, राजकारण विरहित सर्वपक्षीय कार्यकर्ते या सर्वांच्या वतीने रघुवीर खेडकर यांचा रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असून या नागरी सत्कार समारंभामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे.

रघुवीर खेडकर हे संगमनेरकरांचे लाडके रघु भाऊ म्हणून परिचित आहेत. त्यांचा देश पातळीवर झालेला गौरव हा संगमनेरातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाचा असून त्यांच्या सन्मान सत्कार सोहळ्यासाठी आयोजित गौरव समितीमध्ये राजकारण विरहित सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध सेवाभावी संस्था, शैक्षणिक व सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी अशा सर्वांच्या मिळून सर्वानुमते गौरव समिती तडीने स्थापन करणार येणार असल्याचेही आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.

तमाशा सम्राट रघुवीर खेडकर व त्यांच्या मातोश्री स्व. कांताबाई सातारकर यांनी तमाशा लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संगमनेरचे भूषण रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रातील पद्म पुरस्कार जाहीर केल्याने संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून मला व सर्व संगमनेरकरांना अत्यंत आनंद होत आहे. लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सर्व संगमनेरकरांच्या वतीने त्यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
अमोल खताळ (आमदार)

















