नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टोलवसुली थांबवा – आ. सत्यजीत तांबे

0
52

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या काँक्रिटिकरण आणि पुलांच्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठवले असून नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची कामे होईपर्यंत टोलवसुली थांबवा असे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

पूर्वी संगमनेर ते नाशिक हा प्रवास केवळ एका तासात पूर्ण होत होता मात्र सध्या त्याच अंतरासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागत असून नाशिक ते पुणे हा प्रवास तब्बल सहा तासांपर्यंत वाढला आहे. महामार्गावरील मोठमोठे खड्डे, खराब नियोजन आणि अपुरे वाहतूक व्यवस्थापन यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. महामार्गावरील कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांना तासंतास वाहतूक कोंडीत देखील अडकावे लागत आहे.
विशेषतः घुलेवाडी (ता. संगमनेर) आणि नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील पुलांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय महामार्गाची स्थिती अत्यंत खराब असूनही शिंदे पळसे (ता. नाशिक), हिवरेगाव पवसा (ता. संगमनेर) आणि चाळकवाडी, आळेफाटा (ता. जुन्नर) येथील टोल नाक्यांवर नियमित टोल वसुली सुरू आहे.

हे नागरिकांवर अन्यायकारक असल्याचे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून नाशिक – पुणे महामार्गावरील सुरू असलेल्या कामांचा वेग तातडीने वाढवावा आणि कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली थांबवावी अशा दोन महत्त्वपूर्ण मागण्या आ. सत्यजीत तांबे यांनी आपल्या पत्राद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्या आहे.
नाशिक – पुणे महामार्ग हा दररोज हजारो प्रवाशांच्या जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून त्यावरील कामांच्या संथ गतीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या विषयावर केंद्र सरकारने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here