महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला

0
309

राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

बृहन्मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय प्रभाग आहे. त्यामुळे येथील मतदारांना 1 मत द्यावे लागेल. 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत. बहुतांश महापालिकांत एका प्रभागात 4 उमेदवार निवडून द्यायचेत. काही प्रभागात 5 व काही ठिकाणी 3 उमेदवार असतील. त्यामुळे या 28 महापालिकांत मतदारांना एका प्रभागात साधारणतः 3 ते 5 मते द्यावे लागतील, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल. मुंबईत 10, 111 मतदान केंद्र असतील, असे ते म्हणाले.
आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह 29 महापालिकांतील 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात 1442 महिला उमेदवार आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या 341, एसटीच्या 77 व नागरिकांचा मागास प्रवर्गातील 759 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार, 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येईल. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल. 2 जानेवारी 2026 ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जानेवारी 2026 रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाईल, तसेच उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करता येईल. त्यानंतर 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका मागील 5 ते 7 वर्षांपासून किंवा त्याहून अधिक कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here