अहिल्यानगरसह पाच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

युवावार्ता (प्रतिनिधी)
जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पत्र दिले आहे.
सध्या अहिल्यानगर व धुळे जिल्हा परिषदेने बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून नवीन शाळांमध्ये रुजू होण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जळगाव जिल्हा परिषदेने देखील या संदर्भात कार्यवाही सुरू केली असून पुढील आठवड्यात सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातही लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
काय म्हंटले पत्रात ?…
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षकांची नवीन शाळांमध्ये नियुक्ती निश्चित करण्यात आली आहे. तरी सुद्धा अनेक शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेतून अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांना तातडीने कार्यमुक्त करून नवीन शाळांमध्ये हजर होण्याची संधी द्यावी.

शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम
जर शिक्षकांना वेळेत कार्यमुक्त केले गेले नाही तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. बदली आदेश मिळाल्यानंतरही शिक्षक जुन्या शाळेत राहतात त्यामुळे नवीन शाळेत शिक्षकांची कमतरता जाणवते. परिणामी विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ अध्यापन मिळत नाही आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे केवळ शिक्षकांचा संभ्रम वाढत नाही तर शैक्षणिक हितालाही बाधा येते. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून कार्यमुक्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी असे माझे ठाम मत आहे. – आमदार सत्यजीत तांबे
आमदार तांबे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बदली प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षकांची नियुक्ती नवीन शाळांमध्ये निश्चित झाली असली तरी अद्याप त्यांना मूळ शाळेतून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम आणि असमाधान निर्माण झाले आहे. त्याचा थेट परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त न करणे ही अन्यायकारक बाब आहे. तरी तातडीने सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करून त्यांची नवीन शाळांमध्ये पदस्थापना करावी, अशी ठाम मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.