पहिल्या श्रावणी सोमवारी आ. खताळ यांची दैनिक युवावार्ता कार्यालयास भेट

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – परिवर्तनशील पत्रकारीतेचा श्वास व ध्यास असलेले ज्येष्ठ संपादक किसन भाऊ हासे यांनी संगमनेर बरोबरच राज्यात वृत्तपत्र व पत्रकारांचे संघटन करून त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला. संगमनेरची पत्रकारीता राज्यात जोपासण्याचे काम किसन भाऊंनी केले असे गौरवोद्गार संगमनेचे लोकप्रतिनिधी आ. अमोल खताळ यांनी काढले. आमदार झाल्यानंतर आ. खताळ यांनी प्रथमच दैनिक युवावार्ता कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यातच आज पहिला श्रावणी सोमवार या दिवशी ही भेट श्री गणेशाच्या आरतीने द्विगुणीत करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा मराठा सह. पतसंस्थेचे संचालक के. के. डोंगरे, व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्हाडे, संपादक सौ. सुशीला हासे, उद्योजक इंजि. आनंद हासे, कार्यकारी संपादक सुदिप हासे उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. खताळ म्हणाले की हासे परिवाराचे व आमचे जुने ऋणानुबंध आहे. एक कार्यकर्ता म्हणून युवावार्ता वृत्तपत्र नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहिले. माझ्या विजयात माध्यमांचा फार मोठा वाटा आहे. संगमनेरच्या सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रात हासे परिवाराचे मोठे योगदान आहे. युवावार्ता सोबतच आज उद्योग क्षेत्रात इंजि. आनंद हासे, इंजि. सुदीप हासे यांनी घेतलेली गरुडझेप कौतुकास्पद आहे. काम मागण्यापेक्षा काम देणारे हात म्हणून आज या परिवाराकडे पाहिले जाते. युवावार्ताच्या प्रगतीचे आपण साक्षीदार आहोत याचा आपल्याला आनंद आहे. संगमनेरच्या विकासासाठी आपण सातत्याने आग्रही भूमिका घेऊ असेही यावेळी आ. खताळ यांनी सांगितले.

यावेळी संपादक किसन भाऊ हासे यांनी आ. खताळ यांचे स्वागत करून सत्कार केला. साप्ताहिक संगम संस्कृती, दैनिक युवावार्ताची वाटचाल आजच्या अधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवार्ताने घेतलेल्या भरारीची माहिती दिली. आ. खताळ यांच्या रुपाने एक कृतीशील कार्यकर्ता लोकप्रतिनिधी झाला आहे. बी. जे. खताळ पाटील यांचा वारसा आ. खताळ नक्कीच पुढे चालवतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर संपादक, पत्रकार यांच्या प्रश्नांसाठी आपण राज्यपातळीवर कार्यरत असून याकामी आपले सहकार्य मिळावे असे आवाहन त्यांनी आ. खताळ यांना केले. यावेळी इंजि. आनंद हासे यांनी येथील उद्योगासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी तसेच अडचणींविषयी आ. खताळ यांचे लक्ष वेधले. इंजि. सुदीप हासे यांनी आ. खताळ यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेतला. चळवळीच्या जोरावर सामान्य कार्यकर्ताही आमदार होऊ शकतो संगमनेरकरांना आपल्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगितले. युवावार्ता परिवाराचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.