मालपाणी मल्टिप्लेक्सचा आज शुभारंभ !

0
537

संगमनेर, प्रतिनिधी
वॉटरपार्क व थीमपार्कच्या माध्यमातून देशभरात लौकीक मिळवणार्‍या मालपाणी उद्योग समूहाने संगमनेरच्या मनोरंजन क्षेत्रात दमदार पाऊल ठेवले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रात जाणवणारी अत्याधुनिक चित्रपटगृहाची पोकळी भरुन काढताना उद्योग समूहाने दोन पडद्यांचा समावेश असलेल्या मल्टिप्लेक्स सिनेमागृहाची उभारणी केली असून आज (ता.17) सायंकाळी त्याचा शुभारंभ होत आहे. संगमनेरात सुरु होणार्‍या नव्या मल्टिप्लेक्स सिनेमागृहामुळे चांगले चित्रपट पाहण्यासाठी संगमनेरकरांना करावी लागणारी लोणी, नाशिकची वारीही यामुळे वाचणार आहे.

‘गाय छाप’च्या माध्यमातून अवघ्या देशात परिचित असलेल्या मालपाणी उद्योग समूहाने गेल्या दोन दशकांत वॉटरपार्क आणि थीमपार्कच्या क्षेत्रात मोठी व्यावसायिक क्रांती केली आहे. शिर्डीच्या वॉटरपार्कपासून या क्षेत्रात सुरु झालेला उद्योग समूहाचा प्रवास आशिया खंडातील सर्वात मोठ्या इमेजीका वर्ल्डला वळसा घालून मध्यप्रदेशातील इंदूर आणि गुजरातमधील सुरतपर्यंत जावून पोहोचला आहे. व्यावसायिक प्रगतीच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणार्‍या मालपाणी उद्योग समूहाने संगमनेर शहराप्रती असलेल्या संवेदनाही नेहमी जागृत ठेवल्या आहेत.

त्याचाच भाग म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेरकरांना अपेक्षीत असलेल्या मनोरंजन गृहाची निर्मिती करण्यात आली असून मोठ्या पडद्यावर एकाचवेळी दोन वेगवेगळे चित्रपट पाहण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. आकर्षक डिजिटल आवाज, अंतर्गत रचना आणि भव्य रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहताना प्रेक्षकांना वेगळी अनुभूती मिळेल असा विश्‍वास मालपाणी परिवाराला आहे. यापूर्वी चांगले चित्रपट पाहण्यासाठी संगमनेरकर रसिकांना लोणी किंवा नाशिकच्या चित्रपटगृहांमध्ये जावे लागत. मात्र आता त्यांना आता स्थानिक पातळीवरच उत्तम पर्याय मिळाल्याने त्यांची वारीही वाचणार आहे.
आज दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त धरुन मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती ललिता व श्रीमती सुवर्णा मालपाणी यांच्या हस्ते मालपाणी मल्टिप्लेक्सचा शुभारंभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here